भारतीय गोल्फचा गौरव

मुकुंद पोतदार
रविवार, 23 एप्रिल 2017

गोल्फची सुरवात कशी झाली?

या प्रश्नावर ते म्हणाले, की दिल्ली गोल्फ क्‍लबपासून माझे घर फार तीन-चारशे यार्डवर आहे. खेळायला कुणीच नाही, म्हणून मी कोर्सवर जाऊन गोल्फ खेळू लागलो. हा खेळ एकट्याने खेळता येतो. बस्स... अशी झाली सुरवात.

1980 आणि 90च्या दशकात पदार्पण केलेल्या भारतीय खेळाडूंनी प्रदीर्घ कारकीर्द घडविली. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, बुद्धिबळात विश्वनाथन आनंद, फुटबॉलमध्ये बायचुंग भुटीया, टेनिसमध्ये लिअँडर पेस यांच्याप्रमाणेच गोल्फमध्ये गौरव घई आणि मुकेश कुमार यांची नावे घ्यावी लागतील. पुणे ओपन गोल्फ स्पर्धेतील सहभागी खेळाडूंच्या यादीत शेवटचे 125वे नाव गौरव घईचे होते. ते वाचूनच त्याच्याशी संवाद साधायचे ठरविले होते.

सकाळी सात वाजता खेळायला सुरवात केल्यानंतर 18 होल पूर्ण करून गौरव दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास परत आला. प्रसिद्धी व्यवस्थापक निखिल कलान यांनी ओळख करून दिल्यानंतर मी गौरवना म्हटले, की तुम्हाला ब्रेक घेऊन फ्रेश व्हायचे असेल तर मी थांबतो. गौरव यांनी मात्र तशी गरज नसल्याचे स्पष्ट करून मुलाखत सुरू करण्यास सांगितले.

गोल्फची सुरवात कशी झाली, या प्रश्नावर ते म्हणाले, की दिल्ली गोल्फ क्‍लबपासून माझे घर फार तीन-चारशे यार्डवर आहे. खेळायला कुणीच नाही, म्हणून मी कोर्सवर जाऊन गोल्फ खेळू लागलो. हा खेळ एकट्याने खेळता येतो. बस्स... अशी झाली सुरवात.
1981 मध्ये हौशी खेळाडू म्हणून पदार्पण केलेल्या गौरवने 1991 मध्ये व्यावसायिक पदार्पण केले. त्याआधी एमबीएचे ऍडमिशन आणि गोल्फ असे दोन पर्याय होते. एक वर्ष मला गोल्फ खेळू द्यावे, अशी विनंती त्याने वडील श्रीराम यांना केली. त्यांनी एकाच अटीवर परवानगी दिली. घरून पैसे मिळणार नाहीत, हीच अट होती. व्यावसायिक पदार्पण करत त्याने गोल्फमध्ये उडी घेतली. पहिल्या काही स्पर्धांतच त्याला बक्षीस रकमेच्या रूपाने चांगली कमाई झाली.

मर्क्‍युरिज मास्टर्स आणि गाडगीळ वेस्टर्न मास्टर्स या आशियाई टूरवरील दोन स्पर्धांमधील विजेतिपदे त्याच्या कारकिर्दीचा परमोच्च बिंदू ठरली. 11 वर्षांच्या खंडानंतर (1995-2006) त्याने ही दोन विजेतिपदे मिळविली, याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गाडगीळ मास्टर्स जेतेपदामुळे त्याला 80 हजार 750 डॉलरची कमाई झाली. त्या वेळी भारतीय क्रीडापटूला मिळालेला तो सर्वाधिक बक्षीस रकमेचा धनादेश होता.
जीव मिल्खा सिंग आणि अली शेर यांच्या साथीत त्याने 1996 मध्ये डनहील करंडक स्पर्धेत स्कॉटलंडला हरविले. त्या संघात कॉलीन मॉंटगोमेरी व अँड्रयू कॉल्टॅर्ट या दिग्गजांचा समावेश होता. भारतीय संघाचा 2-1 असा विजय गोल्फच्याच नव्हे, तर भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासातील माइलस्टोन मानला जातो. 1997 मध्ये गौरवने आणखी एक माइलस्टोन गाठला. ब्रिटिश ओपन या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला पात्र ठरलेला तो पहिला भारतीय स्पर्धक ठरला.