तरुण पिढीवर जबाबदारी देण्याची हीच वेळ - अभिनव

वृत्तसंस्था
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचा मनोदय भारताचा एकमेव ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने रविवारी सत्यात उतरवला. पुढे जाण्याची आणि तरुणांवर जबाबदारी सोपविण्याची हीच खरी वेळ असल्याचे सांगत त्याने निवृत्तीची अधिकृत घोषणा केली.

रिओमध्ये बिंद्राचे दुसरे ऑलिंपिक पदक थोडक्‍यात हुकले. त्यानंतर तो प्रसार माध्यमांसमोर येण्यास तयारच नव्हता. पण, आज निवृत्तीची घोषणा करताना त्याने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘माझ्यासाठी हा खूप भावनिक दिवस आहे. दोन दशके खेळल्यानंतर मी आता निवृत्त होत आहे. अखेरच्या रिओ ऑलिपिकमध्ये थोडक्‍यात पदक हुकल्याची खंत कायम राहील.’’

पूर्ण कारकिर्दीत राष्ट्रीय रायफल संघटना सदैव पाठीशी उभी राहिल्याबद्दल अभिनवने त्यांचे आभार मानले. त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय उभाच राहू शकलो नसतो, असे सांगून अभिनव म्हणाला, ‘‘मी नेहमीच कठोर मेहनत करण्यास प्राधान्य दिले. यश मिळवायचे असल्यास कठोर मेहनतीशिवाय पर्याय नसतो. मी जेवढे नेमबाजीसाठी दिले, त्याहून अधिक मला या खेळातून मिळाले. मी प्रत्येकाचा आभारी आहे.’’

रायफल संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांच्या हस्ते अभिनवचा गौरव करण्यात आला. ते म्हणाले, ‘‘झोकून देण्याची वृत्ती, ध्येय निश्‍चिती आणि मेहनत याचे अभिनव हे मूर्तिमंत उदाहरण आहे. भविष्यात कायमच तो खेळाडूंसमोर आदर्शच ठरेल.’’