सचिनसह दीपकने संपवला सुवर्णदुष्काळ

sachin and deepak break gold drought
sachin and deepak break gold drought

नवी दिल्ली-  आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेतील सुवर्णदुष्काळ रविवारी अखेरच्या दिवशी सचिन राठी आणि दीपक पुनिया यांनी संपवला. तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांवर चमकदार विजय मिळवून सचिनने (74 किलो), तर दीपकने (86 किलो) वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. सूरज कोकाटे (61 किलो) आणि मोहित (125 किलो) ब्रॉंझपदकाचे मानकरी ठरले.

सचिन राठीने 74 किलो गटात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. थायलंडच्या चैरानुवत, नंतर किर्गिझस्तानच्या बेखजान, उपांत्य फेरीत इराणच्या बख्तियार यांच्यावर चमकदार विजय मिळवून सचिनने अंतिम फेरी गाठली. विजेतेपदाच्या लढतीत त्याच्यासमोर मंगोलियाच्या बकइर्डेन याचे आव्हान होते. बकइर्डेन याने सुरवातीलाच 4 गुण मिळवून आक्रमक सुरवात केली; पण नंतर प्रतिआक्रमण करत सचिनने ताबा मिळवत दोन गुणांची कमाई केली. त्यानंतरही चपळता आणि ताकदीत एक पाऊल पुढे असलेल्या बकइर्डेन याने आक्रमकता कायम राखून 9-4 अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावाच्या मध्यात मात्र संधी मिळताच सचिनने एक चाक डावावर बकइर्डेनला आस्मान दाखवत सुवर्णपदकावर नाव कोरले. 

जागतिक आणि आशियाई स्तरावर यापूर्वीच मोहोर उमटविलेल्या दीपक पुनियाने आपला लौकिक राखत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दीपकने यापूर्वी 2016 मध्ये आशियाई कॅडेट आणि आशियाई कुमार स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. त्यानंतर 2017 मध्ये पुन्हा एखदा या दोन्ही स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला. हा अनुभव पणाला लावत त्याने आता 86 किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

पहिल्या फेरीत इराणच्या सेहीदी, दुसऱ्या फेरीत कझाकिस्तानच्या मेलदेवेक आणि उपांत्य फेरीत जपानच्या कैरीयागीला पराभूत करून दीपकने अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत कैरीयागीला चीतपट करणाऱ्या दीपकने अंतिम फेरीत तुर्कमेनिस्तानच्या अजथ गजबीय याच्यावर सुरवातीपासून वर्चस्व राखले. दोन वेळा ताबा मिळवत त्याने चार गुणांची कमाई केली. अझन आव्हान देण्याच्या प्रयत्नात झोनबाहेर गेल्याने त्याला दोन गुण आयतेच मिळाले आणि त्याने 6 गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा ताबा गुणांची खैरात करत त्याने 10-0 अशा आघाडीवर तांत्रिक गुणाधिक्‍यावर विजय मिळवून सुवर्णपदक मिळविले. 

सूरज कोकाटेने 61 किलो वजनी गटात तैवानच्या हुंग चांग ला चीतपट करून झकास सुरवात केली. मात्र, दुसऱ्या लढतीत तो कझाकिस्तानच्या सार्यवाझकडून पराभूत झाला. अखेरच्या क्षणी सूरजने आकडी डाव टाकला; पण वेळ संपल्यामुळे सूरज दुर्दैवी ठरला. एका सेकंदाचेही मोल केवढे असते हे या लढतीत दिसून आले. पुढे ब्रॉंझपदकाच्या लढतीत त्याने आकडी आणि भारंदाज डावाचा सुरेख वापर करत जपानच्या युतो सुचिया याला निष्प्रभ करत ब्रॉंझपदकावर नाव कोरले. अखेरच्या लढतीत मोहितने 125 किलो वजनी गटात मंगोलियाच्या बी. इर्डेनबतार याच्यावर तांत्रिक गुणांवर विजय मिळवून ब्रॉंझपदक मिळविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com