विराट घडवतोय खेळाडू...

सचिन निकम
सोमवार, 12 डिसेंबर 2016

विराटचे वय आहे 28 वर्षे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील आणखी सात, आठ वर्षांचे सर्वोत्तम क्रिकेट बाकी आहे. कर्णधारपदाचे कधीही दडपण न घेता त्याने आतापर्यंत बहारदार कामगिरी करून दाखविली आहे. विराटच्या या विराट खेळींमुळे त्याने यापुढेही आपल्या धावांचा आणि भारतीय संघाच्या विजयाचा आलेख उंचावत रहावा हीच प्रार्थना कोट्यवधी क्रिकेट चाहते करत आहेत...

धाडसी निर्णय...आक्रमकपणा...वेगळी स्टाईल...धावा करण्यात सातत्य...जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर शिरजोर...खेळाडूंचे मनोबल वाढविण्यात अग्रेसर...अन् खेळाडू घडविण्याची वृत्ती असे सर्व काही एखाद्या खेळाडूत दिसायचे म्हणजे तो दादा अर्थात सौरव गांगूली. आता याच दादाचा वारसदार ठरू पाहतोय तो विराट रनमशीन कोहली. तीन मालिकांमध्ये द्विशतक करणाऱ्या विराटने स्वतःच्या कामगिरीचा आलेख जबरदस्त उंचावला आहेच; शिवाय नवनवीन खेळाडूंनी संधी देऊन खेळाडू घडविण्याचाही विडा उचलला आहे.

सर्वोत्तम कामगिरीची प्रेरणा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2014 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत महेंद्रसिंह धोनीने कसोटी कर्णधारपद सोडून अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत विराटची कामगिरी उत्तम राहिली पण, भारताला ही मालिका जिंकण्यात अपयश आले. लगेचच श्रीलंकेला त्यांच्या मायभूमीत जाऊऩ पराभूत करण्याची किमया करून दाखविली. त्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकाही भारताने विराटच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम जिंकली. एबी डिव्हिलर्स, हाशिम आमला, डेल स्टेन, जेपी ड्युमिनी यासारखे मातब्बर खेळाडू असूनही विराटने आपल्या संघाचे मनोधैर्य उंचावत विजय मिळविला. त्यापाठोपाठ वेस्ट इंडीजला त्यांच्याच देशात आणि आता न्यूझीलंड व इंग्लंडला जवळपास व्हाईटवॉश देत कसोटी क्रिकेटमध्ये मक्तेदारी सिद्ध करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. आता वेळ आहे, ऑस्ट्रेलियाची. ज्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वप्रथम कसोटी कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली, त्याच ऑस्ट्रेलियाला पुढील वर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये मायदेशात होणाऱ्या मालिकेत पाणी पाजण्याची संधी विराटला आहे. विराटने चार हजार धावांचा टप्पा करून आपली सरासरी 50 च्या वर नेली आहे. वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि इंग्लंड या तिन्ही मालिकांमध्ये द्विशतक करत इतर खेळाडूंनाही सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा दिली. याचेच उदाहरण आपल्याला भारताला सलग मिळत असलेल्या विजयांतून दिसून येत आहे.

अश्विनवर विश्वास, जयंत, राहुल, करुण नवे तारे
गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये सरस कामगिरी करत आपले अष्टपैलूत्व सिद्ध करणाऱ्या आर अश्विनवर विराटने कायमच विश्वास ठेवल्याचे पहायला मिळते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत तर अश्विनला मालिकेचा मानकरी म्हणून निवडण्यात आले होते. आता इंग्लंडविरुद्धही त्याने बळी घेण्याचा रतीबच लावला आहे. अश्विन मायदेशात प्रभावी ठरतोच. त्याचवेळी त्याने आपली योग्यता परदेशातही सिद्ध केली आहे. त्यामुळे विराटने आतापर्यंत तरी विश्वास कायम ठेवल्याचे पहायला मिळते. तसेच काही सलामीला सतत अपयशी ठरलेल्या शिखर धवनच्या ऐवजी त्याने यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुलवर विश्वास दाखविला आहे. राहुलला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अपयश आले असले तरी त्याने न्यूझीलंडविरुद्ध चांगल्या धावा केल्या होत्या. पण, युवा खेळाडूंमध्ये विराटचा विश्वास त्याच्यावर अधिक आहे. जयंत यादव या खेळाडूबद्दल सांगावे तितके कमीच आहे. कर्णधाराच्या प्रत्येक कसोटीस उतरणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहता येऊ शकते. जयंतने आपल्या फिरकीने सर्वांना प्रभावित केलेच. त्याची फलंदाजीही त्याहून आणखी प्रभावी ठरली आहे. करुण नायरसारख्या युवा खेळाडूलाही सलग संधी मिळते आहे. यष्टीरक्षक पार्थिव पटेलवर दिनेश कार्तिकपेक्षा विश्वास विराटने दाखविला. त्याचे फळ भारताला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत मिळाले. अनुभवी खेळाडू दुखापतीच्या कारणाने असो किंवा अन्य कोणत्याही; त्यांच्या अनुपस्थितीत नवख्या खेळाडूंना घेऊन विजय मिळविणे शक्य आहे, हे विराटने आपल्या खेळीतून दाखवून दिले आहे.

स्टाईल आणि धावाही
आपला स्टाईलिश लूक सतत बदलणाऱ्या खेळाडूमध्ये भारतीय संघात सर्वाधिक आघाडीचे नाव हे विराटचे आहे. विराट कायम केसांची स्टाईल बदलत असतो. त्याने आता दाढी राखल्याने देशात कोट्यवधी तरूणांच्या चेहऱयावर दाढी दिसते आहे. मैदानावर आपल्या प्रेमाचा उघडपणे स्वीकार करणारा विराट अगदी सार्वजनिक कार्यक्रमातही खुलेपणाने वागण्यास मागेपुढे पाहत नाही. अनुष्का शर्माबरोबर असलेले प्रेमसंबंध त्याने कधीच लपवून ठेवले नाहीत. अगदी कालपर्यंत युवराजसिंगच्या लग्नातही तो अनुष्कासोबत सहभागी झाला होता. त्याची ही आक्रमक स्टाईल मैदानातही अनेकवेळा पहायला मिळते. स्लेजिंगमध्ये वरचष्मा असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या जवळपास जाणारा आक्रमक स्वभाव विराटचाही आहे. विकेट मिळविल्यानंतर विराटकडून करण्यात येणारा जल्लोष हा संघातील खेळाडूंचे मनोबल वाढविणारा असतो. पण, मुंबई कसोटीत अश्विन आणि अँडरसन यांच्या वादात शांततादूत म्हणूनही त्याची भूमिका मोलाची राहिली. कर्णधाराकडून एवढे प्रोत्साहन मिळत असेल तर आपोआपच खेळाडूच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होतो. हे गेल्या काही मालिकांमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराट हा भारतीय संघाचा मॅचविनर खेळाडू म्हणून समोर आला आहे. त्याने या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपली योग्यता सिद्ध करत धावा केल्या आहेत. विराटची या तिन्ही प्रकारातील धावांची सरासरी 50च्या वर आहे. एकही क्रिकेटपटू अशी कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे स्टाईल आणि आक्रमक वृत्तीमुळे प्रसिद्ध असलेल्या विराटने धावांच्या बाबतीतही आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.

पुरी पिक्चर बाकी है
विराटचे वय आहे 28 वर्षे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील आणखी सात, आठ वर्षांचे सर्वोत्तम क्रिकेट बाकी आहे. कर्णधारपदाचे कधीही दडपण न घेता त्याने आतापर्यंत बहारदार कामगिरी करून दाखविली आहे. विराटच्या या विराट खेळींमुळे त्याने यापुढेही आपल्या धावांचा आणि भारतीय संघाच्या विजयाचा आलेख उंचावत रहावा हीच कोट्यवधी क्रिकेटचाहते प्रार्थना करत आहेत. विराट हा कोणाचे विक्रम मोडेल, त्याची किती शतके होतील, त्याच्या धावांची संख्या किती असेल याचे आताच अंदाज लावणे कठीण आहे. पण, त्याच्या फटक्यांतून क्रिकेटप्रेमींना मिळणारा आनंद हा काही वेगळाच आहे, याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.

विराटविषयी

  •  सलग 17 कसोटी सामने अपराजित राहून विराट कोहलीने सुनील गावसकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली
  •  भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक सलग कसोटी विजय सुनील गावसकर (17) यांच्या नावावर
  •  कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा मान विराटकडे
  •  इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट ठरला (640 धावा आतापर्यंत), यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर (602 धावा).
  •  वर्षभरात तीन द्विशतके करणारा विराट भारताचा एकमेव खेळाडू
  •  विराटची 235 धावांची खेळी ही भारताकडून 11 क्रमांकाची सर्वोत्तम खेळी
  •  कर्णधारपद स्वीकारल्यापासून 21 कसोटीत 65.50 च्या सरासरीने 2096 धावा, कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी 31 कसोटीत 41.13 च्या सरासरीने 2098 धावा
  •  विराटच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत खेळलेल्या 21 कसोटीतील 13 सामन्यांत विजय, 2 सामन्यांत पराभव आणि 6 सामने अनिर्णित राहिले.
फोटो गॅलरी