फुलराणींच्या लढतीत सिंधूची साईनावर मात

फुलराणींच्या लढतीत सिंधूची साईनावर मात

मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदकामुळे सिंधूचा खेळ किती बदलला आणि प्रतिकूल परिस्थितीतही तिचा आत्मविश्वास डगमगत नाही, हेच इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या साईना नेहवालविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दिसले. दुसऱ्या गेममध्ये अनेकदा तीन गुणांनी पिछाडीवर पडल्यावरही सिंधू डगमगली नाही. त्यामुळेच तिने जास्त अनुभवी फुलराणी असलेल्या साईनाला पराभूत केले.

दिल्लीत सुरु असलेल्या स्पर्धेतील या लढतीचे वेध रसिकांना दुपारपासून जास्तच लागले होते; पण अगोदरच्या लढती रंगल्यामुळे ही लढत लांबत गेली. साईनाच्या चुकांनी सिंधूचा विजय सुकर केला, असे म्हणणे अयोग्य होईल. सिंधूची सामन्यावरील पकड पाहून साईनावर काहीसे दडपण आले. त्यातच रसिकांसाठी जणू हीच अंतिम लढत झाली होती. अखेर त्यात सिंधूने २१-१६, २२-२० असा विजय मिळविला. सिंधूची उपांत्य फेरीत लढत कोरियाच्या सुंग जी ह्यून हिच्याविरुद्ध होईल.

या लढतीचा शेवट साईनाला शटलचा अंदाज न आल्यामुळे झाला. शटल बाहेर जाईल, हा तिचा कयास खोटा ठरला. खरे तर साईनाकडून यापूर्वी कोणास अपेक्षित नसलेली सर्व्हिसची चूकही झाली. दुसऱ्या गेममध्ये तिने तीन गुणांची आघाडी गमावणे जणू नित्याचेच झाले. 

साईना १९-१६ आघाडीवर असताना सिंधूचे ताकदवान स्मॅश तसेच नेटजवळील टच जबरदस्त होते. ऑलिंपिक रौप्यपदक विजेतीने अखेरच्या सातपैकी सहा गुण जिंकत लढतीत बाजी मारली.

पहिल्या गेममध्ये सिंधूचा तडाखा जबरदस्त होता. दोघींच्या उंचीत फारसा फरक नाही; पण सिंधूच तिच्या उंचीचा फायदा घेत आहे, असेच वाटत होते. साईनाच्या परतीचे फटके ती सहज परतवत होती. अर्थात या गेमच्या अंतिम टप्प्यात तीस शॉटच्या रॅलीने चाहत्यांना खूष केले होते. अनेकदा दोघी एकमेकींच्या तंदुरुस्तीचा, शटलचा अंदाज घेण्याच्या क्षमतेचा चांगला कस बघत होत्या. या चांगल्या लढतीचा शेवट साईनाने सोडलेले शटल कोर्टवर पडून झाला, हेच दुःख देणारे होते.

साईनाला मी हरवावेच इतकी ती स्पेशल नाही
साईना ही काही स्पेशल नाही की तिला दर वेळी हरवावे. ती अन्य खेळाडूंसारखीच आहे. प्रत्येकीविरुद्ध सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करते आणि हेच तिच्याविरुद्धही करते, असे सिंधूने सांगितले. साईनाने बॅडमिंटनचे धडे पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. तिने आता गोपीचंद यांना सोडले आहे; तर गोपीचंद हे सिंधूचे सुरुवातीपासूनचे मार्गदर्शक आहेत. साईनाविरुद्धच्या लढतीत मागे पडल्यानंतरही दडपण नव्हते. माझा माझ्या खेळावर, क्षमतेवर विश्वास आहे. तिसऱ्या गेमचा विचारही माझ्या मनात येत नव्हता. प्रत्येक गुण जिंकण्यासाठी लढण्याचे ठरवले होते आणि त्यात यशस्वी झाले, असे सिंधूने सांगितले.  पत्रकार परिषदेस साईना आलीच नाही. सिंधूला ही स्पेशल मॅच होती, असे विचारण्यात आले. त्यावर तिने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

दोन गेमची लढत; निकाल बदलला
साईना आणि सिंधू यांच्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील ही केवळ दुसरीच लढत होती. या दोघींतील यापूर्वीची लढत २०१४ मध्ये झाली होती. त्या वेळी साईनाने २१-१४, २१-१७ असा विजय संपादला होता. या वेळीही निर्णय दोन गेममध्येच झाला; मात्र विजय सिंधूचा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com