पराभवातूनही खूप साध्य होते : साईना

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

सिंधू सातत्याने अनेक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळत आहे. तिच्या लढती सरस खेळाडूंविरुद्ध होत आहेत. या लढतींतून तिची जिंकण्याची जिगर खूपच उंचावली आहे हे दिसून येते. त्यामुळेच तर तिने आतापर्यंतचे यश मिळवले आहे. 
- साईना नेहवाल

मुंबई : पुनरागमन केल्यानंतर पूर्वीचा सूर गवसण्यास वेळ लागतो. अद्यापही सर्वोत्तम कामगिरीच्या दिशेने वाटचाल सुरूच आहे, असे सांगतानाच साईना नेहवालने गेल्या काही स्पर्धांतील पराभव हा पुन्हा बहरात येण्याच्या प्रक्रियेचा एक प्रकारे भागच असल्याचे सांगितले. 

रिओ ऑलिंपिकदरम्यान साईनाची गुडघा दुखापत उफाळून आली होती. तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तीन महिने ती कोर्टपासून दूर होती. शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन केल्यावर पूर्ण जोशात खेळ होत नाही. काही महत्त्वाच्या हालचालींचा विसर पडलेला असतो. त्या पुन्हा गवसण्यास वेळ लागतो. कोर्टवर पुन्हा येतो, त्या वेळी दुखापतीचे विचार मनात कायमच असतात, असे तिने सांगितले. 

साईनाचा नेटजवळील खेळ सरस होत नसल्याकडे मार्गदर्शक विमल कुमार यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत साईना म्हणाली, मी ज्या परिस्थितीतून गेले आहे, ते पाहता हे अनपेक्षित नाही. नेटजवळील खेळ सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

पुनरागमनानंतरची प्रत्येक लढत महत्त्वाची आहे. काही लढतींत निर्णायक गेममध्ये 18 गुणांपर्यंत गेल्यावरही पराजित झाले आहे. आता या प्रकारच्या लढतीही आपण तीन गेमपर्यंत लढू शकतो, हा विश्वास देतात. यश मिळाल्यावर आत्मविश्‍वास उंचावतो. सलग स्पर्धांमुळे तंदुरुस्तीही महत्त्वाची आहे. माझा सर्वोत्तम खेळ होण्यास लवकरच सुरवात होईल. हे अगदी पाच-सहा आठवड्यांत घडू शकेल, असे साईनाने सांगितले. त्याचबरोबर स्पर्धा जिंकण्यास सुरवात झाल्यावर मानांकनही उंचावते, असे तिने सांगितले. 

Web Title: Saina Nehwal reacts to question of coming out of injury