सुवर्णपदक जिंकण्याचे साक्षीवर दडपण 

Sakshi Malik
Sakshi Malik

मुंबई/नवी दिल्ली : आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या अनेक दिग्गज कुस्तीगिरांच्या अनुपस्थितीत ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेत्या साक्षी मलिककडून सुवर्णपदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. याचे दडपण आपल्यावर येत असल्याची कबुली साक्षीने दिली. 

आशियाई स्पर्धेत साक्षी अपयशीच ठरली आहे. गतवर्षीच्या स्पर्धेत आठ स्पर्धकांत ती पाचवी आली होती. अन्य भारतीय पदक जिंकत असताना साक्षीचे अपयश खटकणारे होते. यंदा परिस्थिती बदलली आहे. दिल्लीच्या खाशाबा जाधव स्टेडियमवर उद्यापासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत ती भारताची एकमेव ऑलिंपिक पदक विजेती आहे आणि ती सुवर्णपदक जिंकणारच असे गृहीत धरले जात आहे. 

रिओतील यशानंतर साक्षीचा नियमित सराव झालेला नाही. साखरपुडा, विवाह, सत्कार सोहळे, जाहिरातीचे शूटिंग, फोटोशूट यातच जास्त व्यग्र होती. त्याचा परिणाम तिच्या सरावावर झाला. प्रो कुस्ती लीगमध्येही ती काही लढतीच खेळली; मात्र तिने निवड चाचणी स्पर्धेत प्रभावी विजय मिळवत संघात स्थान मिळविले. 

स्पर्धा पुनरागमनाच्या वेळी दडपण हे असणारच. ऑलिंपिक पदक विजेती असल्यामुळे जास्त अपेक्षाही असणार. त्यातच स्पर्धा भारतात आहे, असे साक्षीने सांगितले. तिच्यासमोरील आव्हान सोपे नाही. तिच्या गटातील चीनची झिंगरू पेई जागतिक विजेती आहे; तसेच ऑलिंपिकमध्ये साक्षीकडून पराजित झालेली गत आशियाई विजेती ऐशुलू त्यानुबेको रिओचा वचपा काढण्यास उत्सुक असेल. 

साक्षीला, तुझ्याकडे जास्त लक्ष असेल, असे म्हटल्यावर माझे लक्ष सत्यव्रतकडे जास्त असेल, असे हसत हसत सांगितले. साक्षीचा पती सत्यव्रत 97 किलो फ्री-स्टाईल स्पर्धेत खेळणार आहे. सत्यव्रतची स्पर्धा 12 तारखेला आहे, तर साक्षीची 13 ला. एकमेकांचा सल्ला आमच्यासाठी खूपच मोलाचा असतो, असे तिने सांगितले; मात्र त्याच वेळी चाहत्यांनाच काय पदाधिकाऱ्यांनाही आपल्याकडून सुवर्णपदकच हवे, याची तिला खात्री आहे. 

आजचे भारतीय आव्हान 
ग्रीको रोमन -
66 किलो : रवींदर. 75 किलो : गुरप्रीत. 80 किलो : हरप्रीत. 98 किलो : हरदीप. 130 किलो : नवीन. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com