संजीवनीने मोडला कविताचा उच्चांक

Sanjivani-Jadhav
Sanjivani-Jadhav

बंगळूर - नाशिकच्या संजीवनी जाधवने बंगळूर १० किलोमीटर शर्यतीत भारतीय गटात स्पर्धा विक्रम नोंदविला. तिने कविता राऊतचा विक्रम मोडतानाच आंतरराष्ट्रीय गटाच्या एकूण क्रमवारीत दहावे स्थान मिळवित कौतुकास्पद कामगिरी केली. उष्ण हवामान असूनही संजीवनीने हा पराक्रम केला.

संजीवनीने ३३ मिनिटे ३८ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. तिने या स्पर्धेतील वैयक्तिक तसेच स्पर्धा विक्रम नोंदविला. २०१६ मध्ये तिने ३६ः१३ सेकंद वेळ नोंदवित दुसरा क्रमांक मिळविला होता. या वेळेत तिने २ः३५ सेकंदांनी सुधारणा केली. याआधीचा ३४ः३२ सेकंद वेळेचा स्पर्धा विक्रम कविताने २००९ मध्ये नोंदविला होता.

संजीवनीने उच्च महत्त्वाकांक्षा बाळगूनच धावायला सुरवात केली. भारतीय धावपटूंमध्ये ती, मोनिका आठरे आणि स्वाती गाढवे आघाडीच्या जथ्यात होत्या. तीन किलोमीटरच्या टप्प्याला संजीवनी आणि स्वाती जथ्यातून वेगळ्या झाल्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. स्वातीच्या आव्हानामुळे संजीवनीने अखेरच्या किलोमीटरला वेग वाढविला.

संजीवनीने सांगितले की, स्वाती अनुभवी आणि भक्कम धावपटू आहे; पण एक किलोमीटर अंतर उरले असताना मी केवळ पुढे पाहात शक्‍य तेवढ्या वेगाने धावायचे ठरविले.

स्वातीने ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे; पण सात किलोमीटरच्या टप्प्यापासून तिचा वेग कमी झाला. शेवटच्या टप्प्यात पोट दुखायला लागल्यामुळे परिणाम झाल्याचे तिने सांगितले.

भारतीय गटात किरणजित कौरने (३५.२५ सेकंद) तिसरा क्रमांक मिळविला. ती आणि स्वातीमध्ये केवळ १७ सेकंदांचा फरक होता. वर्षा नामदेव (३५:५४) चौथी, तर मोनिका (३६:०३) पाचवी आली. आंतरराष्ट्रीय शर्यतीत केनियाच्या ॲग्नेस टिरोप (३१:१९), सेनबेरे टेफेरी (३१:२२) व कॅरोलिन किपकिरुई (३१:२८) यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले.

नवा स्पर्धा विक्रम नोंदविल्यामुळे मला फार आनंद झाला आहे. कविता ताईलासुद्धा तिचा विक्रम मी मोडल्याचा आनंद झाला असेल, याची मला खात्री आहे. नाशिकला आम्हा दोघींची ॲकॅडमी एकच आहे. कविता खूप ‘सीनियर’ आहे. मी तिचा आदर्श ठेवतच कारकीर्द सुरू केली.
- संजीवनी जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com