सुपरफास्ट सेरेना अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जुलै 2016

मी फार आनंदात आहे. मी कमालीची एकाग्रता राखू शकले. आम्हा दोघींत आधी काही सामने चुरशीचे झाले होते. ग्रास-कोर्टवर एलेना चांगली खेळते याची मला कल्पना होती. माझा विजय सोपा नव्हता. तुम्हाला प्रत्येक गुणासाठी संघर्ष करावा लागतो.

- सेरेना विल्यम्स

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अँजेलिकने सेरेनाला तीन सेटमध्ये हरविले होते. त्यामुळे अंतिम सामन्याची उत्कंठा वाढली आहे. सेरेनासमोर पराभवाची परतफेड करण्याचे आव्हान आहे.

सेरेनाला फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत गार्बिन मुगुरुझाने हरविले होते. त्यामुळे सेरेनाची मोसमातील पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाची प्रतिक्षा कायम आहे. 

उपांत्य फेरीत ३४ वर्षांच्या सेरेनाने २९ वर्षांच्या एलेनावर ४८ मिनिटांत मात केली. तिने केवळ दोन गेम गमावले. सेरेनाने बिगरमानांकित एलेनाला संधी अशी दिलीच नाही. दुसरा सेट तर तिने ‘लव्ह’ने जिंकला. एलेनाने दुहेरीत दोन वेळा ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे. जागतिक क्रमवारीत ५०व्या स्थानावर असलेली एलेना एकेरीत मात्र प्रथमच ग्रॅंड स्लॅम उपांत्य सामना खेळत होती. पण सेरेनासारखी प्रतिस्पर्धी समोर असल्यामुळे तिच्यावर दडपण आले होते. पहिले चार गेम तिने गमावले. पहिला सेट तिने २८ मिनिटांत गमावला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र तिचा प्रतिकार साफ ढेपाळला. यात सेरेनाच्या सर्व्हिसवर तिला केवळ तीनच गुण जिंकता आले.

निकाल

महिला एकेरी (उपांत्य) ः सेरेना विल्यम्स (अमेरिका १) विवि एलेना व्हेस्नीना (रशिया) ६-२, ६-०. अँजेिलक केर्बर (जर्मनी ४) विवि. व्हिनस विल्यम्स (अमेरिका ८) ६-४, ६-४.

Web Title: Serena Williams 'heavy favourite' to beat Angelique Kerber