विश्वकरंडक कबड्डी : चढाई-पकडीच्या दोन बाजू 

Kabaddi India
Kabaddi India

ऑलिंपिकमध्ये एखाद्या खेळाचा समावेश करायचा असेल, तर तो खेळ पाच खंडात आणि किमान देशात खेळला जावा लागतो. प्रो कबड्डीच्या यशामुळे ऑलिंपिकचे वेध लागलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने (खरं तर भारतीय कबड्डी संघटनाच) विश्वकरंडक कबड्डी स्पर्धेचा घाट घातला होता. अहमदाबादमध्ये ही स्पर्धा मोठ्या दिमाखात... प्रो कबड्डीत असतो तशा दिमाखात पार पडली. लाईट... ऍक्‍शन... कॅमेरा... असा चमचमाच आणि झगमगाटाला भुळलेले प्रामुख्याने परदेशी खेळाडू या खेळाच्या प्रेमात पडले नाहीत, तर नवलच होते.

विश्वकरंडक स्पर्धेचा हा तसा पहिलाच प्रयत्न नव्हता. या अगोदर दोनदा अशी स्पर्धा झाली होती; पण त्या स्पर्धा आणि आताचा हा मेघा इव्हेंट यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. सोशल मीडिया आणि फोर जीच्या या जमान्यात तुम्ही तुमचे प्रोडक्‍ट कसे तयार करता, यापेक्षा त्याचे मार्केटिंग कसे करता? यावर या प्रोडक्‍टची किंमत ठरते. मशाल आणि स्टार स्पोर्टसने कबड्डीचे केलेले मार्केटिंग जबरदस्तच आहे. ऑलिंपिक किंवा आशियाई स्पर्धांमध्ये यजमान देशांकडून किंवा प्राबल्य असलेल्या देशांकडून त्यांच्या काही नव्या खेळांचा समावेश होत असतो. तेव्हा असे खेळ पाहिले की, आपली कबड्डी किंवा खो-खो किती तरी पटीने सर्वोत्तम खेळ असल्याचे दिसून येते. त्यामुळे जर कबड्डीला ऑलिंपिकसाठी तयार करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे. अहमदाबादमधील विश्वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने मात्र चढाई-पकडींप्रमाणे दोन बाजू समोर येतात. 

पहिली बाजू :
यातील पहिली बाजू प्रोडक्‍ट तयार करून चढाई करण्याची. मशाल आणि स्टार स्पोर्टसने परिपूर्ण पॅकेज प्रो कबड्डीच्या निमित्ताने करून दिले. आतापर्यंत भारतीय कबड्डी संघटनेला किंवा आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाला हे कधीच जमले नव्हते. आशियाई स्पर्धेत या खेळाचा समावेश असूनही त्याची व्याप्ती आशियाईच्या बाहेर खऱ्या अर्थाने किंवा टिळा लावण्याप्रमाणे गेली नव्हती. या स्पर्धेच्या निमित्ताने आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातील संघांना स्थान मिळाले (देण्यात आले).

कोणत्याही नावाजलेल्या खेळाच्या विश्वकरंडक स्पर्धेत एक तर सर्व संघांना पात्रता सिद्ध करावी लागते किंवा पहिले मानांकित संघ सोडले, तर इतरांना पात्रता निकष पार करावा लागतो. नऊ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झालेल्या कबड्डीच्या विश्वकरंडकासाठी हा निकष ठेवण्याचा प्रश्‍नच येत नव्हता. खरं तर 2007 च्या स्पर्धेत 16 संघ होते, या वेळी ही संख्या 12 आहे. ठराविक संघ, ठराविक कालावधी आणि यापेक्षा टीआरपीसाठी प्राईम टाईम सर्वांत महत्त्वाचे होते. असो, अमेरिका, पोलंड, अर्जेंटिना, केनिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांना कबड्डी या खेळाची तोंडओळख तर झाली. कबड्डीच्या कौशल्यापेक्षा धरपकडींचाच खेळ ते अधिक करत होते; पण त्यात त्यांचाही दोष नव्हता. कारण, स्पर्धेच्या एक महिना अगोदर या संघातील बहुतेक खेळाडूंनी कबड्डी... कबड्डी... कबड्डी असा उच्चार केला असेल. 

दुसरी बाजू :

प्रोडक्‍ट विकण्याची घाई करून पकड होण्याची आहे. कबड्डी ही आता सोन्याचे अंडे देणारी कोंबडी झाली आहे. ऑलिंपिक हे अंतिम ध्येय असले, तरी विश्वकरंडक स्पर्धा हा त्याचा राज मार्ग आहे, हे खरे आहे. भारत, इराण, पाकिस्तान, कोरिया आणि बांगलादेश हे देश सोडले तर कबड्डीत इतर देश बाल्यावस्थेतच आहेत. काही देशांनी केवळ यू ट्युबवरून कबड्डीची प्राथमिक माहिती मिळवली असेल, तर अशा संघांसह लगेचच विश्वकरंडक स्पर्धेची घाई करणे उचित होते का? हा प्रश्न उपस्थित होतो. अर्जेंटिना किंवा अमेरिका संघातील खेळाडू कबड्डीपेक्षा रग्बी खेळाच्या तंत्रानुसार धरपकड करीत होते. (एक मात्र खरं की, ते जे काही खेळत होते, त्याचा मनापासून आनंद घेत होते) या स्पर्धेसाठी मलेशिया, श्रीलंका हे संघही येणार होते; पण ऐन वेळी माशी शिंकली आणि कबड्डीमध्ये बऱ्यापैकी कामगिरी करणाऱ्या या देशांची माघार चुरस कमी करणारी ठरली. पाकिस्तानचा तर भारतात खेळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नव्हता. एक दोन संघांचा प्रवास खर्च आंतरराष्ट्रीय संघटनेने केला, असेही ऐकण्यात येत होते. यावरून इतक्‍या लवकर हा अट्टाहास करण्यापेक्षा या संघांची चांगली तयारी करून जर स्पर्धा घेण्यात आली असती, तर किमान त्या त्या देशांमधले सामने चुरशीचे झाले असते. 

योगायोग की..? 
दोन्ही बाजू पाहिल्यानंतर आता स्पर्धेतील खेळाचे विश्‍लेषण करणे गरजेचे आहे. सलामीलाच भारताचा झालेला पराभव आणि पोलांडकडून इराणने स्वीकारलेली हार भुवया उंचावणारी होती. भारत आणि इराण हेच दोन तगडे संघ आहेत. या संघातच अंतिम सामना होणे अपेक्षित होते. प्रो कबड्डीचा माहोल टीव्हीवरून अनुभवल्यानंतर आता तोच जल्लोष याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी मिळणार असल्यामुळे स्टेडियममधील त्यांचा प्रतिसाद जोरदार होता. प्रश्न होता तो टीव्हीवरील प्रेक्षकांचा. अपेक्षितप्रमाणे घडले असते, तर साखळी सामन्यांना काहीच अर्थ राहिला नसता; पण भारताचा कोरियाकडून पराभव झाला आणि चुरस निर्माण झाली. त्यामुळे इराणला उपांत्य सामन्यातच भारताचा सामना करावा लागला असता. हे टाळण्यासाठी त्यांनी साखळीतील अखेरच्या सामन्यात दुबळ्या आणि नवख्या पोलांडकडून स्वीकारलेली हार ही संशयास्पद होती. एक उक्ती प्रसिद्ध आहे. खोट बोला पण नीट बोला.. इराणच्या तरबेज खेळाडूंना खोटा खोटा खेळ कबड्डी जाणकारांना जाणवत होता. कबड्डीतही म्हटलं तर लुटूपुटूचा खेळ करता येतो, हे त्यातून सिद्ध झाले. पुढच्या दिवशी त्याच इराणच्या खेळाडूंनी जबरदस्त खेळ खेळला. त्या वेळी तोच इराणचा संघ होता का? असा प्रश्न जवळपास प्रत्येकाला पडला होता. कोणत्याही स्पर्धेत बाद फेरीतील संघ निश्‍चित होण्यासाठी अखेरचा साखळी सामन्यापर्यंत उत्कंठा टिकून राहणे, हा योगायोग म्हणावा की अन्य काही..? 

आता पुढे काय..?
असो, खंड पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात तर झाली. आता दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होत राहिली पाहिजे, असाही निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर नव्या परदेशी संघांना परस्परांमध्ये मालिका खेळण्याच्याही सूचना देण्यात आल्या; पण कोणताही निर्णय घेतल्यानंतर होणारी अंमलबजावणी सर्वांत महत्त्वाची असते आणि खर्चही. आता समजा, ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना यांनी परस्परांमध्ये मालिका खेळण्याचे ठरवले, तर खर्च कोण करणार? कोणत्या मैदानावर खेळणार? त्यासाठी लागणाऱ्या पंच अधिकाऱ्यांची व्यवस्था कोण करणार? असे अनेक प्रश्न आहेत. अशा मालिकांसाठी प्रायोजक मिळणार नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेची इच्छाशक्ती आणि तत्परता निर्णायक ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com