आशियाई बॉक्‍सिंग : शिवा, सुमीत अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

विकासचा प्रतिस्पर्ध्यास 'बाय' 
भारताच्या विकास क्रिष्णन याने 75 किलो वजनी गटातील उपांत्य लढतीत कोरियाच्या चौथ्या मानांकित ली डोंगयुन याला 'बाय' दिला. त्यामुळे त्याला ब्रॉंझपदकावरच समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे विकास आज सकाळी वजन देण्यासही उपस्थित नव्हता. विकासने 'बाय' देण्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

ताश्‍कंद : भारताचा चौथा मानांकित शिवा थापा (60 किलो) आणि सुमीत संगवान (91 किलो) यांनी आपली जबरदस्त आगेकूच कायम राखत आशियाई बॉक्‍सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. अनुभवी विकास क्रिष्णनला ब्रॉंझपदकावरच समाधान मानावे लागले. 

शिवा थापाने मिळविलेला विजय सनसनाटी ठरला. त्याने मंगोलियाचा ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेता आणि अव्वल मानांकित डॉर्नयाम्बुग ओटगोन्डलई याचा पराभव केला. सुमीतने तजाकिस्तानच्या द्वितीय मानांकित जाखोन कुर्बोनोव याचे आव्हान संपुष्टात आणले. 

जागतिक स्पर्धेतील ब्रॉंझपदकाचा मानकरी असलेल्या शिवाने सध्याच्या आशियाई विजेत्या मंगोलियाच्या डॉर्नयाम्बुग याच्यावर लक्षवेधक विजय मिळविला. पहिल्या तीन मिनिटांत दोघेही प्रतिस्पर्धी आक्रमण करण्याच्या तयारीत नव्हते. प्रथम कोण आक्रमण करणार याचीच वाट दोघांनी पाहिली. मात्र, दुसऱ्या फेरीत शिवाने आपला पवित्रा बदलला. त्याने पंच आणि हुक्‍सचा सुरेख वापर केला. त्याच्या फटक्‍यात असलेली अचूकता जबरदस्त होती. त्यामुळे मंगोलियन प्रतिस्पर्धी दडपणाखाली आला. तिसऱ्या फेरीत मंगोलियन प्रतिस्पर्धीने प्रतिआक्रमण केले. पण, शिवाने आपला बचाव आक्रमणाइतकाच भक्कम ठेवला. त्यामुळे जज्जेसनी शिवाच्या बाजूने कौल दिला. गेल्या वर्षी वजनी गट बदलल्यानंतर शिवाचे लाईटवेट प्रकारातील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक ठरेल. त्याची गाठ आता उझबेकिस्तानच्या एल्नूर अब्दुरअईमोवशी पडेल. त्याने चीनच्या जुन शान याचा पराभव केला. 

सुमीतसमोर कुर्बोनोव अभावानेच आव्हान उभे करू शकला. कुर्बोनोव या स्पर्धेतील गत ब्रॉंझपदक विजेता आहे. चपळ पदलालित्य राखणाऱ्या सुमीतने सरळ रेषेत ताकदवान पंचेस मारून कुर्बोनोवला निष्प्रभ केले. त्याचा बचावही भक्कम राहिल्याने कुर्बोनोवला आपला खेळच दाखवता आला नाही. 

यापूर्वीच्या 2015 मधील स्पर्धेत भारताने चार पदके मिळविली होती. त्या वेळी विकास रौप्य, तर शिवा, देवेंद्रो, सतीशकुमार ब्रॉंझपदकाचे मानकरी ठरले होते. आशियाई स्पर्धेत भारताला अखेरचे सुवर्णपदक शिवानेच 2013 मध्ये मिळविले होते. 

Web Title: Shiva Thapa reaches finals of Asian Boxing tournament