पद्माकर शिवलकर, राजिंदर गोयल यांना सीके नायडू पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

मुंबई - गुणवत्ता असूनही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी न मिळालेल्या राजिंदर गोयल तसेच पद्माकर शिवलकर या दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांचा भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षीक पुरस्कार सोहळ्यात  ‘सी. के. नायडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. पतौडी स्मृती व्याख्यान आणि पुरस्कार सोहळा बंगळूर येथे ८ मार्च रोजी पार पडेल. 

मुंबई - गुणवत्ता असूनही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी न मिळालेल्या राजिंदर गोयल तसेच पद्माकर शिवलकर या दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांचा भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षीक पुरस्कार सोहळ्यात  ‘सी. के. नायडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. पतौडी स्मृती व्याख्यान आणि पुरस्कार सोहळा बंगळूर येथे ८ मार्च रोजी पार पडेल. 

एन. राम, रामचंद्र गुहा आणि डायना एडल्जी यांच्या समितीने हा निर्णय घेतला आहे. या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गुणवत्ता असूनही अांतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या या दोन गोलंदाजानी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत मात्र, आपल्या फिरकी गोलंदाजीने सर्वच दिग्गज फलंदाजांना नाचविले. 

अनोखा विक्रम
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत या दोन्ही गोलंदाजांचा सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आहे. गोयल यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत ७५० गडी बाद केले आहे. यात त्यांच्या नावावर रणजी स्पर्धेतील सर्वाधिक ६३७ विकेट्‌स घेण्याचा पराक्रम आहे. गोयल यांनी कारकिर्दीत ५९ वेळा डावात पाच किंवा त्याहून अधिक गडी बाद केले. त्याचबरोबर सामन्यात १८वेळा त्यांनी दहा किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले. शिवलकर यांनी १२४ प्रथम श्रेणी लढतीत ५८९ फलंदाज बाद केले आहेत. त्यांनी ४२ वेळा डावात पाच किंवा त्याहून अधिक तर, सामन्यात १३वेळा दहा किंवा त्याहून अधिक गडी बाद केले आहेत.

प्रथमच महिलांचा सन्मान
यंदापासून महिला क्रिकेटपटूसही जीवनगौरव पुरस्कार देण्याचे ठरले आहे. पहिला मान माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांना लाभला आहे. त्यांनी १२ कसोटी आणि १६ एकदिवसीय लढतीत भारताचे नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर या वामन कुमार तसेच रमाकांत देसाई (मरणोत्तर) यांचाही खास पुरस्कार देऊन वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात गौरव होईल.

 इंजिनियर यांचे भाषण
‘बीसीसीआय’च्या वार्षिक मन्सूर अली खान पतौडी व्याख्यानमालेत या वेळी भारताचे माजी यष्टिरक्षक फरुख इंजिनियर यांचे व्याख्यान होईल. सर्वात चपळ यष्टिरक्षक आणि आक्रमक फलंदाज अशी त्यांची ख्याती होती. इंजिनियर ४६ कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत.

जे मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही, पण हेही नसे थोडके. बीसीसीआयने केलेल्या या सन्मानाचा ऋणी आहे.
- पद्माकर शिवलकर

महिला क्रिकेटपटूंना अखेर न्याय मिळाला. आमचा काळ कठिण होता. भविष्यात महिला क्रिकेटपटंूसाठी भक्कम पायाभरणी करण्याची  आमच्यात अजूनही क्षमता आहे.
- शांता रंगास्वामी

Web Title: Shivalkar, Goyal c K naidu award