श्रेयसला कांजिण्यांची लागण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

नवी दिल्ली - दिल्ली डेअरडेव्हिल्सचा फलंदाज श्रेयस अय्यर याला कांजिण्यांची लागण झाली आहे. त्यामुळे तो आयपीएलमधील पहिले काही सामने खेळू शकणार नाही. क्विंटन डिकॉक आणि जेपी ड्यूमिनी यापूर्वीच अनुपलब्ध आहेत. त्यामुळे दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. श्रेयसला दिल्लीने 2015 मध्ये घेतले. तेव्हा त्याने 14 सामन्यांत 439 धावा फटकावल्या. गेल्या मोसमात मात्र तो सहा सामन्यांत केवळ 30 धावा करू शकला. त्यामुळे अंतिम संघातील स्थान त्याने गमावले होते. यंदा स्थानिक मोसमात मात्र त्याने जोरदार फॉर्म प्रदर्शित केला होता. सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध शतक, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक अशी कामगिरी त्याने केली होती. दिल्लीचे मेंटॉर राहुल द्रविड यांनी संघाची मदार अय्यर-संजू सॅमसन-रिषभ पंत आणि करुण नायर या चार तरुण खेळाडूंवर असेल, असे वक्तव्य अलीकडेच केले होते.