साई प्रणीत, श्रीकांतचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

उपांत्य फेरीत दाखल, सिंधूचे मरिनविरुद्धचे हॅट्ट्रिकचे स्वप्न भंगले
मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू कॅरोलिन मरीनविरुद्धची विजयाची हॅट्ट्रिकचे साधू शकली नाही. त्याचवेळी बी साई प्रणीत आणि किदांबी श्रीकांत यांनी सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

उपांत्य फेरीत दाखल, सिंधूचे मरिनविरुद्धचे हॅट्ट्रिकचे स्वप्न भंगले
मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू कॅरोलिन मरीनविरुद्धची विजयाची हॅट्ट्रिकचे साधू शकली नाही. त्याचवेळी बी साई प्रणीत आणि किदांबी श्रीकांत यांनी सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

भारतीय बॅडमिंटनच्या महिला एकेरीत भारताचा सिंधू आणि साईनाच्या रूपाने प्रभावी एस इफेक्‍ट आहे, असे सांगितले जात होते; पण हा एस इफेक्‍ट आता साई प्रणीत आणि श्रीकांतच्या यशाने अनुभवत आहोत, अशीच भावना बॅडमिंटन वर्तुळात व्यक्त होत आहे. यामुळे सुपर सीरिज स्पर्धा इतिहासात प्रथमच दोन भारतीयांत अंतिम लढत होण्याची शक्‍यता दिसत आहे. उपांत्य फेरीत साई प्रणीतची लढत ली डॉंग केऊनविरुद्ध, तर श्रीकांतची लढत अँथनी गिटिंगविरुद्ध होईल.

किदांबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत आठव्या असलेल्या शि युकी याला 21-14, 21-16 असे हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या गेममध्ये सुरवातीस आघाडी बदलत होती; पण एकदा श्रीकांतचा जम बसल्यावर युकीला प्रतिकाराचीही संधी मिळाली नाही. काही महिन्यांपूर्वी जागतिक क्रमवारीत तिसरा असलेल्या पण त्यानंतर दुखापतीचा फटका बसलेल्या श्रीकांतचे ड्रॉप्स युकीसाठी चांगलेच डोकेदुखी ठरले. त्याचे पदलालीत्यही जबरदस्त होते. दुसऱ्या गेमच्या ब्रेकच्यावेळी त्याच्याकडे 11-10 आघाडी होती; पण त्यानंतर सहज गुण जिंकत श्रीकांतने आगेकूच केली.

साई प्रणीतने प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने सव्वा तास रंगलेल्या या लढतीत आठव्या मानांकित तानोंगसाक साएन सोमबूनसुक याला 15-21, 21-14, 21-19 असे हरवले. सय्यद मोदी ग्रा. प्रि. उपविजेत्या साई प्रणीत पहिला गेम गमावल्यावर चांगले प्रतिआक्रमण केले. त्याने निर्णायक गेममध्ये मोक्‍याच्यावेळी शांतपणे खेळ करीत गुण जिंकत आगेकूच केली.

सिंधूचा सूरच हरपलेला
सिंधूला तिच्या लौकिकानुसार खेळच करता आला नाही. दिल्लीत मरिनला हरवलेली सिंधू आज जणू कुठेतरी हरवली होती. मरिनच्या वेगवान, आक्रमक खेळासमोर तिने शरणागती पत्करली, असेच म्हणावे लागेल. आज सिंधूला शटल नियंत्रितच करता येत नव्हते. मरिन गेल्या दोन पराभवाचे उट्टे काढण्यासाठीच जणू कोर्टवर उतरली होती. दिल्लीत सिंधूने मरिनला नेटपासून रोखले होते. तेच आज लुप्त होते.

स्पर्धेत स्वप्नवत वाटचाल सुरू आहे. उपांत्य फेरीतील प्रवेश नक्कीच सुखावत आहे. निर्णायक गेममध्ये अखेरच्या क्षणापर्यंत चुरस होती, त्यात सरस ठरल्याचा आनंद आहे. अंतिम फेरीचा विचार करण्याऐवजी सध्या उपांत्य फेरीच्या लढतीवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
- बी साई प्रणीत

Web Title: singapur super series badminton competition