क्रमवारीच्या शर्यतीत अनुभवाची कोंडी

maha kabaddi
maha kabaddi

पुणे - बाद फेरीतील प्रवेश निश्‍चित असताना गटातील पहिला, दुसरा क्रमांक ठरविणाऱ्या सामन्यात मंगळवारी अनुभवाची कोंडी झाली. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात महिला विभागात रत्नागिरी रेडर्स संघाने अनुभवी अभिलाषा म्हात्रेच्या रायगड डायनामोजचा २४-१८ असा, तर पुरुष विभागात रायगड डायनामोजने ‘प्रो’चा अनुभव असणाऱ्या उमेश म्हात्रे, विकास काळे यांच्या मुंबई महाकाळ संघाचा ४३-२९ असा पराभव केला.

गटातील क्रमवारी निश्‍चित करणाऱ्या सामन्यात पुरुष विभागात रायगडने झकास सुरवात केली. विशेष म्हणजे सुरवातीपासून त्यांच्या मंगेश भगत, सुलतान डांगे यांच्या चढाया, तर अरिफ सय्यद आणि परेश म्हात्रे यांचे कोपरारक्षण अचूक होत होते. या चौघांमधील समन्वय सामन्यागणिक अधिकच घट्ट होत गेला. त्यामुळे मुंबईचा एकही चढाईपटू आपला खेळ दाखवू शकला नाही. उमेश म्हात्रेच्या एरवी वेगवान ठरणाऱ्या चढायादेखील फोल ठरल्या. दुसरीकडे मंगेशच्या तुफानी चढायांनी मुंबईचा बचाव खिळखिळा केला. त्याला सुलतान डांगेची साथ मिळाली. त्यामुळे विश्रांतीला मिळविलेली १८-१२ ही आघाडी उत्तरार्धात वाढवत नेत रायगडने सहज विजय मिळविला. मुंबईकडून उमेश म्हात्रे, विकास काळे यांना आलेले अपयशच त्यांच्या पराभवाचे खरे कारण ठरले. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात उमेशची एकमेव सुपर रेड वगळता खास असे मुंबईच्या हाती काहीच लागले नाही.

रत्नागिरीचा रायगडला शह

महिला विभागात अनुभवी अभिलाषा म्हात्रेच्या रायगड डायनामोज संघाला शह देत रत्नागिरी रेडर्स संघाने गटात अव्वल स्थान मिळविले. विश्रांतीच्या ९-१० अशा एका गुणाच्या पिछाडीनंतर उत्तरार्धात बचावात आक्रमक झालेल्या रत्नागिरीने २४-१८ असा विजय मिळविला. पूर्वार्धात दोन्ही संघांचा पवित्रा सावध असाच होता. गुण मिळविण्याची घाई न करता ‘थर्ड रेड’चा उपयोग करून घेण्यावरच भर होता. त्यामुळे संथ झालेल्या सामन्यात पूर्वार्धात फारशी चुरस दिसली नाही. उत्तरार्धात मात्र रायगडने बचावात आक्रमकता दाखवत रायगडच्या चढाईपटूंची कोंडी केली. यात त्यांनी अभिलाषाची पकड केली आणि संधीचा फायदा उठवत रत्नागिरीने सामन्यातील एकमेव लोण चढवला. सायली जाधव, आरती यादव आणि अंकिता चव्हाण यांनी केलेल्या पकडी त्यांच्या विजयात निर्णायक ठरल्या. सायलीने चढाईतही चमक दाखवत आपल्या अष्टपैलू खेळाची चमक दाखवली. अभिलाषा मैदानात असेपर्यंत रायगडचे आव्हान होते. उत्तरार्धाच्या सुरवातीला अंकिताने सुपर टॅकल करत रत्नागिरीवर बसणारा लोण फिरवला होता. खऱ्या अर्थाने तेथेच सामना रत्नागिरीच्या बाजूने झुकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com