स्पेनची नवी रणनीती रोनाल्डोला रोखणार? 

 Spain's new strategy will prevent Ronaldo?
Spain's new strategy will prevent Ronaldo?

खेळ असो वा जीवन कधीकधी अनपेक्षित ट्विस्ट येत असतात. 21 वी विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होत असताना, अशीच सनसनाटी घटना घडली. स्पेनने मुख्य प्रशिक्षक जुलेन लोपेटेगुई यांची स्पर्धा सुरू होण्याच्या काही तास अगोदर हकालपट्टी केली. स्पर्धेच्या उंबरठ्यावर असा धक्कादायक निर्णय कोणत्या संघाने या अगोदर घेतला असेल, असे मला आठवत नाही. अशा निर्णयामुळे संघाची सर्व गणितेच बदलू शकतात. या पार्श्‍वभूमीवर माझे स्पेन विरुद्ध पोर्तुगाल या लढतीकडे अधिक लक्ष लागले आहे. वेगळ्या रंगछटेमध्ये हा सामना खेळला जाईल. नवे प्रशिक्षक फर्नांडो हिएरो आणि त्यांचा नवा संघ पहिल्या लढतीसाठी तरी कसे एकरूप होतात, हे महत्त्वाचे ठरणार नाही. अशक्‍य नसले, तरी कठीण नक्कीच आहे. सर्वच खेळाडू व्यावसायिक आहेत आणि प्रत्येकाला आपल्या जबाबदारीचे भान आहे. त्यामुळे मैदानावर ते कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

ही घटना घडली नसती, तर हा सामना चेंडूवर ताबा मिळवत आक्रमण करणारा स्पेन विरुद्ध बचावावर अधिक भर असलेला पोर्तुगाल असा झाला असता. ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखे अस्त्र भात्यात असूनही पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सॅंतोस यांनी याच डावपेचावर भर देत 2016 च्या युरो स्पर्धेत यश मिळवले होते. याच तंत्राचा ते या विश्‍वकरंडक स्पर्धेतही वापर करतील, असा माझा अंदाज आहे; परंतु स्पेनची सध्याची मनस्थिती पाहता पोर्तुगालने सुरवातीलाच आक्रमण करून पकड मिळवण्याचा प्रयत्न केला, तर मला आश्‍चर्य वाटणार नाही. असा खेळ झाला आणि सुरवातीलाच त्यांनी गोल करण्यात यश मिळवले, तर स्पेनची कसोटी पणास लागणार आहे. 

प्रतिहल्ला करण्यास पोर्तुगालची 4-4-2 ही रचना तयार असते. ते प्रतिस्पर्ध्यांना आपल्या अर्धात येण्याचे लालूच दाखवतात आणि संधी मिळताच प्रतिहल्ला करतात. कारण एकदा का रोनाल्डोच्या पायात चेंडू मिळाला की गोल करणारा धोकादायक स्ट्रायकर आपल्याकडे आहे, याची त्यांना जाणीव आहे. आत्तापर्यंत त्यांनी नियोजित आणि योजनाबद्ध रणनीती तयार करून त्यानुसार खेळ केलेला आहे. जर, त्यांनी सक्षम आणि चुकांरहित खेळ केला, तर ते स्पेनच्या बचावाला सैरभेर करतील आणि त्याचा फायदा घेण्यास स्टार स्ट्रायकर सज्ज

स्पेनचे अगोदरचे प्रशिक्षक लोपेटेगुई यांनी 4-2-3-1 ची रचना केलेली आहे. ही रचना हिएरो कायम ठेवतात की बदलतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. माझ्या मते ते कायम ठेवणार नाहीत. या रचनेनुसार ते प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात आक्रमण वाढवतात आणि त्यांच्यापाठी मधली फळीही भक्कम झालेली असते. जरी एकच स्ट्रायकर असला, तरी गोल करण्याच्या इतर कोनातूनही संधी तयार झालेली असते. एका मित्रत्वाच्या सामन्यात याच रचनेत खेळ करताना त्यांनी अर्जेंटिनाचा 6-1 असा पराभव केला होता; यावरून त्यांचा स्ट्रायकिंग झोन किती भक्कम आहे, हे सिद्ध होते. 

रामोस वि. रोनाल्डो 
या लढतीद्वारे आपल्याला रोनाल्डो विरुद्ध स्पेनच्या सेरगी रामोसचा बचाव या रेयाल माद्रिदच्या सहकाऱ्यांमधला सामना पाहायला मिळणार आहे. आपल्याला रोखण्यासाठी रामोस सर्व ट्रीकचा अवलंब करणार, याची जाणीव रोनाल्डोलाही आहे. पण, रोनाल्डोही अनुभवी आहे आणि त्यालाही या रणनीतीची कल्पना असणारच. स्पेन-पोर्तुगाल लढत आणि त्यानंतर लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा सामना, अशी मेजवानी मिळणार असल्यामुळे विश्‍वकरंडक स्पर्धेची रंगत सुरवातीपासूनच वाढणार आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com