झाझरिया, सरदारचा ‘खेलरत्न’ने गौरव

पीटीआय
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - राष्ट्रीय क्रीडादिनी गुरुवारी देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचा आणखी एक सोहळा पार पडला. पण, दरवर्षीप्रमाणे या वेळीही सोहळ्याला नाराज खेळाडूंच्या न्यायालयीन लढाईचे गालबोट लागले.

नवी दिल्ली - राष्ट्रीय क्रीडादिनी गुरुवारी देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचा आणखी एक सोहळा पार पडला. पण, दरवर्षीप्रमाणे या वेळीही सोहळ्याला नाराज खेळाडूंच्या न्यायालयीन लढाईचे गालबोट लागले.

नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात हा क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला. पॅरालिंपियन देवेंद्र झाझरिया आणि हॉकीपटू सरदार सिंग यांना ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थीमधील क्रिकेटपटू चेतेश्‍वर पुजारा वगळता सर्व खेळाडू या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पुजारा कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये असल्यामुळे सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकला नाही. या वेळी प्रथमच दोन दिव्यांग खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यामध्ये झाझरियासह पॅरालिंपिक विजेता मरियप्पन थांगवेलू याला ‘अर्जुन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

या वर्षीचे पुरस्कारही वादापासून दूर राहू शकले नाहीत. पुरस्कार समितीने ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारासाठी शिफारस केलेली पॅरालिंपिक प्रशिक्षक सत्यनारायण आणि कबड्डी प्रशिक्षक हिरा नंदा कटारिया यांना क्रीडा मंत्रालयाने पुरस्कार नाकारला. यातही सत्यनारायण यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले सुरू असल्यामुळे त्यांचे नाव वगळले, तर कटारिया यांच्या पुरस्काराला कबड्डी महासंघ आणि खेळाडूंनीच आक्षेप घेतल्यामुळे त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली.

त्याचबरोबर ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी डावलल्यामुळे वेटलिफ्टिंग खेळाडू संजिता चानू आणि बास्केटबॉलपटू ए. अनिता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखवल केली आहे. यावर सरकारने या दोघींच्या प्रकरणात लक्ष घालू, असे आश्‍वासन दिले आहे. सरकारला १४ दिवसांत न्यायालयाला उत्तर  द्यायचे आहे.