मॅंचेस्टर युनायटेडचे भावपूर्ण यश

पीटीआय
शुक्रवार, 26 मे 2017

सॉल्ना, स्टॉकहोम, स्वीडन - मॅंचेस्टर युनायटेडच्या फुटबॉलपटूंनी जिद्दीने खेळत ॲजेक्‍स ॲमस्टरडॅम संघाला हरवून प्रतिष्ठेचा यूएफा युरोपा लीग करंडक जिंकला. मॅंचेस्टरमधील आत्मघातकी हल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा सामना त्यांच्यासाठी भावनात्मक ठरला होता. त्यात वेन रुनीच्या संघाने चमकदार विजय मिळविला. याबरोबरच मॅंचेस्टर युनायटेडने चॅंपियन्स लीगच्या गटसाखळीची पात्रतासुद्धा नक्की केली.

मॅंचेस्टरमधील हल्ल्यात बळी पडलेल्यांना सामन्यापूर्वी आदरांजली अर्पण करण्यात आली. त्या वेळी प्रेक्षकांनी ‘मॅंचेस्टर, वुई विल नेव्हर डाय’ असा जयघोष केला. खेळ सुरू होताच मॅंचेस्टर युनायटेडच्या खेळाडूंनी प्रेरित खेळ केला. पॉल पोग्बा याने कराराची विक्रमी रक्कम सार्थ ठरविली. त्याने १८व्या मिनिटाला खाते उघडले, तर दुसऱ्या सत्रात हेन्रीख मिखातार्यन याने गोल केला. त्याने ४८व्या मिनिटाला लक्ष्य गाठले. ॲजेक्‍सच्या खेळाडूने ‘थ्रो-इन’ केल्यानंतर मॅंचेस्टर युनायटेडने चेंडूवर ताबा मिळविला. पोग्बाने मारलेला चेंडू अनपेक्षित वळून ॲजेक्‍सचा गोलरक्षक आंद्रे ओनाना चकला. हेन्रीखने कॉर्नरवर गोल केला.

प्रशिक्षक होजे मॉरीनियो यांच्यासाठी हे यश सुखद ठरले. ओल्ड ट्रॅफर्डवरील पहिल्या मोसमात लीग करंडक आणि कम्युनिटी शिल्ड जिंकल्यानंतर क्‍लबने हे यश मिळविले. मुख्य म्हणजे प्रीमियर लीगमध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागल्यानंतर या यशामुळे त्यांचा चॅंपियन्स लीगमधील सहभाग नक्की झाला. मॉरीनियो म्हणाले, की ‘प्रीमियर लीगमध्ये चौथे, तिसरे किंवा दुसरे स्थान मिळविण्यापेक्षा या मार्गाने चॅंपियन्स लीगमध्ये प्रवेश करण्यास आमची पसंती होती. आम्ही एक महत्त्वाचा करंडक जिंकून हे लक्ष्य साध्य केले.’

रुनीला वगळले
दरम्यान, इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट यांनी राष्ट्रीय संघातून वेन रुनीला वगळले. इंग्लंडचा विश्‍वकरंडक पात्रता ‘फ’ गटात स्कॉटलंडविरुद्ध दहा जून रोजी सामना आहे.