...तोवर पाकिस्तानशी क्रीडा संबंधही नाहीत : विजय गोयल

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

पाकिस्तानातही खेळणे सुरक्षित नाही. अनेक देश पाकिस्तानात खेळण्यास राजी नाहीत हे सत्य आहे, असे सांगून गोयल म्हणाले, "अवघ्या जगाला पाकिस्तान दहशतवादास पाठिंबा देत असल्याचे माहीत आहे. एकही देश पाकिस्तानात खेळण्यास तयार नाही. पाकिस्तानी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रापासून दूर ठेवल्यावर तरी त्यांना आपले सरकार चुकीचे वागत असल्याचे कळेल.'' 

नवी दिल्ली - सीमेपलीकडून सातत्याने पाकिस्तानकडून होणारा शस्त्रसंधीचा भंग आणि दहशतवादाची बोळवण करणे जोवर थांबवले जात नाही, तोवर पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचा क्रीडा संबंध ठेवला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रिय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी बुधवारी येथे केली. 

नवी दिल्लीत 10 ते 14 मे दरम्यान होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या मल्लांनी व्हिसा नाकारल्याप्रकरणी बोलताना त्यांनी सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, "दहशतवाद आणि खेळ हातात हात घालून चालू शकत नाही. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचा भंग करत आहे. जोपर्यंत ते दहशतवादास पाठिंबा देणे थांबवत नाहीत, तोवर त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे क्रीडा संबंध ठेवण्यात येणार नाहीत.'' 

पाकिस्तानातही खेळणे सुरक्षित नाही. अनेक देश पाकिस्तानात खेळण्यास राजी नाहीत हे सत्य आहे, असे सांगून गोयल म्हणाले, "अवघ्या जगाला पाकिस्तान दहशतवादास पाठिंबा देत असल्याचे माहीत आहे. एकही देश पाकिस्तानात खेळण्यास तयार नाही. पाकिस्तानी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रापासून दूर ठेवल्यावर तरी त्यांना आपले सरकार चुकीचे वागत असल्याचे कळेल.'' 

गेल्यावर्षी कुमार विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघास व्हिसा नाकारण्यात आला. काही दिवसांपूर्वी आशियाई वैयक्तिक स्क्वॅशस्पर्धेसाठी देखील पाकिस्तानी खेळाडूंना परवानगी नाकारण्यात आली आणि आता कुस्तीपटूंनाही रोखले. यावरून पाकिस्तानशी क्रीडा संबंध नकोतच यावर केंद्र सरकार ठाम असल्याचे दिसून येते. 
प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रकारांसाठी पाकिस्तानबाबत हीच भूमिका कायम राहिल्यास पाकिस्तानी खेळाडूंना कधीच संधी मिळणार नाही, असे सांगून पाकिस्तान कुस्ती महासंघाचे सरचिटणीस महंमद अर्षद यांनी आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांना यापुढे भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी तक्रार करणार असल्याचे सांगितले.