टेनिसपटू अंकिताच्या यशाची मॅरेथॉन कहाणी

टेनिसपटू अंकिताच्या यशाची मॅरेथॉन कहाणी

पुणे - नव्या स्पर्धेसाठी नव्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर एखाद-दोन दिवसांचा ब्रेक, आंतरराष्ट्रीय सामन्यांपूर्वी सराव सामन्यांची संधी, दोन सामन्यांमध्ये पुरेसा ब्रेक अशी चैन क्रिकेटसह काही सांघिक खेळांमध्ये उपभोगता येते. अशावेळी व्यावसायिक टेनिसपटूंना किती खडतर वेळापत्रकाला सामोरे जावे लागते आणि त्यानंतरही ते मॅरेथॉन लढा देत कसे सुयश संपादन करतात याचे कौतुकास्पद उदाहरण अंकिता रैनाच्या रूपाने समोर आले.

तुर्कस्तानमधील आर्टवीनमधील स्पर्धेत अंकिताने दुहेरीत विजेतेपद मिळविले. ब्राझीलच्या गॅब्रीएला चे हिच्या साथीत तिने भाग घेतला होता. या स्पर्धेपूर्वी ती जर्मनीतील लिपझीगमध्ये खेळली. क्रोएशियाची तेरेझा म्रेड्‌झा तिची जोडीदार होती. लिपझीगमधील अंतिम सामना संपल्यानंतर तिचा मॅरेथॉन प्रवास सुरू झाला.

अंकिताने सांगितले, की सामन्यानंतर मी लिपझीग रेल्वे स्थानकावर दाखल झाले. मला हवी ती गाडी मिळणार नव्हती. त्यामुळे समोरच असलेल्या बस स्थानकावरून मी बस पकडली तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले होते. मग मध्यरात्री अडीच वाजता मी बर्लिन विमानतळावर दाखल झाले. सकाळी सात वाजता मी इस्तंबूलच्या विमानात बसले. तेथून दुपारी तीन वाजता मी ट्रॅब्झॉन विमानतळावर आले. मग कारमधून अडीच तास बसचा प्रवास केल्यानंतर मी आर्टवीनला दाखल झाले.

आर्टवीनमध्ये पावसामुळे अंकिताला एकेरीचे दोन सामने एकाच दिवशी गुरुवारी खेळावे लागले. दुसऱ्या फेरीत क्रोएशियाच्या ॲना व्रील्चीच हिला तिने ६-१, ४-६, ६-४ असे हरविले. मग उपांत्यपूर्व फेरीत तिला चौथ्या मानांकित तुर्कस्तानच्या अयाला अस्कू हिच्याकडून ६-३, ४-६, १-६ असे पराभूत व्हावे लागले. याशिवाय दुहेरीचीही उपांत्यपूर्व लढत झाली.

या स्पर्धेविषयी ती म्हणाली की, अंतिम सामन्यात मी माझी सर्व्हिस राखली. गॅब्रीएलाची सर्व्हिस दोन्ही सेटमध्ये प्रत्येकी एकदा खंडित झाली, पण आम्ही जास्त ब्रेक मिळविले. संपूर्ण स्पर्धेत आम्ही एकही सेट गमावला नाही.

गॅब्रीएला-अंकिताला मानांकन नव्हते. जोडीदाराविषयी ती म्हणाली की, या स्पर्धेपूर्वी आम्ही एकमेकींना भेटलो सुद्धा नव्हतो. मी तिचे नाव सुद्धा ऐकले नव्हते, पण आमची जोडी येथे एकत्र आली. या स्पर्धेपूर्वी आम्ही क्‍ले कोर्टवर खेळलो होतो. ही स्पर्धा हार्ड कोर्टवर होत असल्यामुळे प्रथमच एकत्र खेळताना आम्हाला जुळवून घेण्यास वेळ लागला. गॅब्रीएला खुप चाणाक्ष टेनिसपटू आहे. महत्त्वाचे म्हणजे ती शांतचित्ताने खेळते. त्यामुळे आमच्यावर दडपण येत नाही. आम्ही डावपेच व्यवस्थित आखू शकतो.

भारताची एकेरीतील सर्वोत्तम क्रमांकाची (२७०) खेळाडू असलेली अंकिता दुहेरीत सानिया मिर्झा (८) आणि प्रार्थना ठोंबरे (१३०) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर (१८९) आहे. या स्पर्धेत तिने उपांत्य फेरीत प्रार्थनावर मात केली होती.

अंकिताने यापूर्वी इटली, थायलंड व बेल्जियममधील स्पर्धांत दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. 

अंकिता-गॅब्रीएलाची कामगिरी ः पहिली फेरी ः डीया हेर्डझेलास-तेरेझा म्रेड्‌झा ७-५, ६-४. उपांत्यपूर्व ः नातीला डीझाल्मीद्‌झे-व्हॅलेरिया सॅवनीख (दुसरे मानांकन) ७-५, ६-३. उपांत्य ः प्रार्थना ठोंबरे-ॲना वेसेलीनोविच (तिसरे मानांकन) ६-२, ६-२. अंतिम ः एलिस्टा कोस्तोवा-याना सिझीकोवा (चौथे मानांकन) ६-२, ६-३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com