‘चॅलेंजर’ने बनविले अर्जुनला ‘आव्हानवीर’

‘चॅलेंजर’ने बनविले अर्जुनला ‘आव्हानवीर’

पुणे - घरच्या कोर्टवरील एटीपी चॅलेंजर स्पर्धेत सहभागी होऊन सरस प्रतिस्पर्ध्याविरुद्ध झुंजार खेळ केल्यामुळे टेनिसपटू अर्जुन कढे याला आत्मविश्वास लाभला. त्याच बळावर त्याने व्यावसायिक पदार्पणाच्या मोसमात आयटीएफ स्पर्धेत कारकिर्दीतील पहिलेच विजेतेपद मिळविले.

व्हिएतनाममधील थू डाऊ मॉट सिटीमध्ये झालेल्या स्पर्धेत अर्जुनने अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या अँड्य्रू हॅरीसला ७-५, ६-३ असे हरवून ही कामगिरी केली. यानिमित्त व्हॉट्‌सॲप कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला असता अर्जुन म्हणाला की, पुण्यातील चॅलेंजर स्पर्धेत मी दिलेली झुंज महत्त्वाची ठरली.

७५२व्या स्थानावरील अर्जुनने ३१३व्या क्रमांकावरील अँटे पॅविचला दोन टायब्रेकपर्यंत संघर्ष करायवास लावला. या स्पर्धेत वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्याचा एमएसएलटीएचा निर्णय त्याने सार्थ ठरविले.

अर्जुनने व्यावसायिक पदार्पणासाठी एक टर्म आधी पदवी संपादन केली. त्यामुळे मोसमाच्या दुसऱ्या टप्प्यात जास्त प्रमाणावर होणाऱ्या आयटीएफ स्पर्धांमध्ये तो भाग घेऊ शकला. या कामगिरीमुळे सुरवातीचा टप्पा पार झाल्याचे त्याने सांगितले.

अर्जुनला यशाचा जल्लोष करता आला नाही. त्याने सांगितले की, माझा सामना दुपारी साडेबारा वाजता संपला. मला हो चि मिन्ह सिटीतून क्वालालंपूरचे विमान दुपारी चार वाजता पकडायचे होते. त्यामुळे मी थेट हॉटेलवर गेलो. जेवायला वेळच नव्हता. मग मोटारीतून दोन तास प्रवास करून हो चि मिन्ह सिटी गाठले. तेथून क्वालालंपूर व जाकार्ता असा प्रवास केला. स्पर्धेच्या ठिकाणी पोचेपर्यंत मध्यरात्रीचे दोन वाजले होते.

दरम्यान, जाकार्तातील स्पर्धेत अर्जुनला पाचव्या मानांकित जपानच्या सोरा फुकुदाने ६-७(४), ७-६ (६), ७-६(३) असे हरविले. हा सामना तीन तास १८ मिनिटे चालला.

माईंड गेम...
अर्जुन अमेरिकेतील कॉलेज टेनिसमध्ये ओक्‍लाहोमा स्टेकडून खेळला, तर अँड्रयूने ओक्‍लाहोमा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. या दोन संघांमध्ये भारत-पाकिस्तानसारखी चुरस असते. अंतिम सामन्याच्या दिवशी अँड्य्रूचे वडील ओक्‍लाहोमा विद्यापीठाची कॅप घालून आले होते. कॉलेज टेनिसमुळे दोघांच्या अमेरिकेतील सहकाऱ्यांचे लढतीकडे लक्ष होते. देशाच्याच नव्हे, तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचाही मुद्दा होता. अशावेळी अर्जुनने प्रतिस्पर्ध्याच्या वडिलांनी घातलेल्या कॅपमुळे खचून न जाता प्रेरणाच घेतली. अमेरिकेतील सहकारी ल्यूकास गेर्च, दुहेरीतील जोडीदार ज्युलियन कॅश, ट्रीस्टीयन मेरॅयूट. जेकब स्यूड, मुख्य प्रशिक्षक जय उदवाडिया, सहप्रशिक्षक मॅरेक मिचालीका, आदींनी त्याचे विजयाबद्दल अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com