एटीपी स्पर्धा महाराष्ट्राचा मानबिंदू बनवू - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - राज्यात आणि देशात असंख्य टेनिसप्रेमी आहेत. ग्रॅंड स्लॅम स्पर्धांचा टीव्हीवर आस्वाद घेतला जातो. प्रत्यक्ष स्टेडियमवर उच्च दर्जाची स्पर्धा पाहण्याचा अनुभवसुद्धा रंगतदार असतो. एटीपी टेनिस स्पर्धेच्या आयोजनामुळे टेनिसप्रेमींना पर्वणी मिळेल. ही स्पर्धा आम्ही महाराष्ट्राचा मानबिंदू बनवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई - राज्यात आणि देशात असंख्य टेनिसप्रेमी आहेत. ग्रॅंड स्लॅम स्पर्धांचा टीव्हीवर आस्वाद घेतला जातो. प्रत्यक्ष स्टेडियमवर उच्च दर्जाची स्पर्धा पाहण्याचा अनुभवसुद्धा रंगतदार असतो. एटीपी टेनिस स्पर्धेच्या आयोजनामुळे टेनिसप्रेमींना पर्वणी मिळेल. ही स्पर्धा आम्ही महाराष्ट्राचा मानबिंदू बनवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एक जानेवारीपासून म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण त्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृहात हा कार्यक्रम झाला. ही स्पर्धा आगामी काळात मुंबईमध्ये आयोजित करण्याचे संकेतही त्यांनी दिले. मुख्य संयोजक म्हणून टाटा समूह आणि प्रेझेंटिंग स्पॉन्सर म्हणून अदर पूनावाला क्‍लीन सिटी इनिशिएटीव्ह यांनी पुढाकार घेतल्याची घोषणा त्यांनी केली. ही स्पर्धा टाटा ओपन महाराष्ट्र या नावाने ओळखली जाईल. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की चेन्नईतील स्पर्धेच्या संयोजनात काही अडथळे आल्याची माहिती आम्हाला देण्यात आली. त्यापाठोपाठ स्पर्धेच्या संयोजनाचा प्रस्ताव एमएसएलटीएने मांडला.

आमच्या प्रयत्नांना टाटा समूहाने पाठबळ दिले. देशातील क्रीडा विकासाकरिता टाटा समूहाने नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यांच्याबरोबरील भागीदारी अभिमानास्पद आहे. अदर पूनावाला यांचा उपक्रमसुद्धा उदात्त आणि अनोखा आहे.

टाटा समूहाच्या बनमाली आग्रावाला यांनी सांगितले, की स्पर्धेसाठी पाच वर्षांचा करार आहे. 

संयोजन सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले, की राज्यात प्रशिक्षण उपक्रमाला चालना देण्यात येईल. त्या दृष्टीने ॲकॅडमी स्थापन केली जाईल. स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले, की ॲकॅडमीचे स्वरूप टेनिस स्कूलसारखे असेल. त्यात ग्रामीण भागातील खेळाडूंचे प्रमाण २५ टक्के असेल. ही ॲकॅडमी देशातच नव्हे, तर आशियात सर्वोत्तम बनविण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले, की या स्पर्धेमुळे चाहत्यांना दर्जेदार खेळाडूंचा खेळ पाहायला मिळेल आणि त्यामुळे महाराष्ट्र जागतिक टेनिसच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवेल. जगतील ४० देशांत अशी स्पर्धा होते. त्यामुळे ही स्पर्धा महत्त्वाची घटना ठरेल. सूत्रसंचालन सुंदर अय्यर यांनी केले.

दृष्टिक्षेपात
     ३०-३१ डिसेंबर रोजी पात्रता लढती
     १ ते ६ जानेवारीदरम्यान मुख्य स्पर्धा
     बक्षीस रक्कम पाच लाख ५० हजार डॉलर
     विजेत्याला ८० हजार डॉलरची कमाई
     जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेला क्रोएशियाचा मरिन चिलीच मुख्य आकर्षण
     केव्हीन अँडरसन (दक्षिण आफ्रिका-१४), रॉबर्टो बॉटिस्टा आगुट (स्पेन-२०), रॉबिन हासी (नेदरलॅंड्‌स-४२) इतर प्रमुख खेळाडू

Web Title: sports news ATP competition Maharashtra's main point