थायलंड बॅडमिंटन : साईप्रणित अंतिम फेरीत

पीटीआय
रविवार, 4 जून 2017

बॅंकॉक : भारताच्या बी. साईप्रणितने अवघ्या 36 मिनिटांत शानदार विजय मिळवला आणि थायलंड ओपन ग्रांप्री गोल्ड करंडक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली; मात्र महिला विभागात द्वितीय मानांकित साईना नेहवालचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे भारताला शनिवारी संमिश्र यश मिळाले.

बॅंकॉक : भारताच्या बी. साईप्रणितने अवघ्या 36 मिनिटांत शानदार विजय मिळवला आणि थायलंड ओपन ग्रांप्री गोल्ड करंडक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली; मात्र महिला विभागात द्वितीय मानांकित साईना नेहवालचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे भारताला शनिवारी संमिश्र यश मिळाले.

साईप्रणित सध्या दिमाखदार कामगिरी करत आहे. उपांत्य सामन्यात त्याने पन्नावेत थोंगनुमला प्रतिकाराचीही संधी न देता 21-11, 21-15 असा विजय मिळवला. साईप्रणितने पहिला गेम इतक्‍या वेगात जिंकला की पन्नावेतला सावरण्याची संधीही मिळाली नाही. तरीही त्याने प्रतिकार केला. दुसऱ्या गेमच्या मध्यावर या दोघांमधले अंतर केवळ एका गुणाचे होते.

त्यानंतर साईप्रणितने जोरदार स्मॅश देत आघाडी वाढवत नेली आणि हा गेमही आरामात जिंकला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात साईप्रणितची लढत चौथ्या मानांकित इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीशी होईल. ख्रिस्तीने मलेशियाच्या जो वॅन सुंगवर 21-9, 21-18 अशी मात केली. साईप्रणितने एप्रिल महिन्यात सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली होती. सुपर सीरिजमधील हे त्याचे पहिलेवहिले अजिंक्‍यपद होते. अंतिम सामन्यात त्याने भारताच्याच किदांबी श्रीकांतला हरवले होते.

साईप्रणितच्या अंतिम फेरीतील प्रवेशाने भारतीय गोटात आनंदाचे वातावरण असताना साईनाच्या पराभवाने हिरमोड झाला. शुक्रवारी तिने कडव्या लढतीनंतर विजय मिळवला होता; पण आज तिला बुसानान आँगबामरुंघफानविरुद्ध 19-21, 18-21 अशा पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना 53 मिनिटे चालला. पहिल्या गेममध्ये निर्णायक क्षणी साईनाने सोप्या सोप्या चुका केल्या. दुसऱ्या गेममध्ये तिने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला; परंतु थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याने तिला परतण्याची संधी दिली नाही.