अधिबनच्या यशोमालिकेमुळे भारतीय पुरुषांचा विजय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

मुंबई - ग्रॅण्ड मास्टर अधिबन भास्करनची बहारदार कामगिरी कायम राहिल्यामुळे भारतीय पुरुषांनी जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत बलाढ्य युक्रेनला हरवले, तर महिला संघाने ताकदवान चीनला बरोबरीत रोखले. स्पर्धेच्या दोन फेऱ्या शिल्लक असताना भारताचे दोनही संघ पदकाच्या शर्यतीत आहेत. 

रशियात सुरू असलेल्या या स्पर्धेत अधिबनने चौथा विजय मिळविला आणि भारताने ही लढत २.५-१.५ अशी जिंकली. अधिबनने त्याच्यापेक्षा सरस मानांकन असलेल्या अँतॉन कॉरोबॉव याला फ्रेंच ओपनिंग पद्धतीने झालेल्या सामन्यात ३४ चालीत हरवले. विदीत गुजराती आणि रुस्लान पोनोमारिऑव यांच्यातील लढत ९५ चालीनंतर बरोबरीत सुटली, तर कृष्णन शशीकिरण आणि परिमार्जन नेगीने त्यांच्या लढती झटपट बरोबरीत सोडवल्या. भारतीय संघ आता १६ गुणांसह चौथा आहे. आघाडीवरील चीनचे १८.५ गुण आहेत. 

महिलांच्या लढतीत पद्मिनी रौतने पांढरी मोहरी असल्याचा फायदा घेत क्वी गाओ हिला हरवले खरे; पण इशा करवडे ली तिंगजे विरुद्ध पराजित झाली. लीने या स्पर्धेत सातपैकी सहा लढती जिंकल्या आहेत. द्रोणावली हरिकाने जागतिक आव्हानवीर जु वेनजुन हिला बरोबरीत रोखले, तर तानिया सचदेवने जागतिक विजेत्या तॅन झाँगयी हिला गुण वाटून देण्यास भाग पाडले. तानियाला विजयाची संधी होती, असे तज्ज्ञांचे मत आहे. महिला संघ १४.५ गुणांसह पाचवा आहे, तर आघाडीवरील रशियाचे १९ गुण आहेत.