लंडन क्‍लासिक स्पर्धेत आनंद संयुक्त शेवटचा

लंडन क्‍लासिक स्पर्धेत आनंद संयुक्त शेवटचा

लंडन - भारताचा ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंदला कारकिर्दीत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दीर्घ काळानंतर निराशाजनक अपयश पत्करावे लागले. लंडन क्‍लासिक स्पर्धेत तो संयुक्त शेवटच्या स्थानावर फेकला गेला.

पाच वेळच्या विश्‍वविजेता आनंद आणि इग्लंडचा मायकेल ॲडम्स संयुक्त नववे आले. एकूण दहा खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग होता. अमेरिकेचा ग्रॅंडमास्टर फॅबियानो कॅरुआना विजेता ठरला. तो आणि इयन नेपोमियांछी यांचे प्रत्येकी सहा गुण झाले. त्यामुळे चार ब्लीट्‌झ डावांचा टायब्रेक झाला. त्यात कॅरुआना २.५-१.५ असा जिंकला. पहिले तीन डाव बरोबरीत सुटले. त्यानंतर कॅरुआनाने पांढऱ्या मोहऱ्यांसह चौथा डाव जिंकला.

विश्‍वविजेत्या मॅग्नस कार्लसनने अखेरच्या फेरीत लेव्हॉन अरोनीयनला हरवून तिसरे स्थान मिळविले. कॅरुआनाने तीन विजय व सहा बरोबरी अशी अपराजित मालिका राखली. त्याने २९०१ एलो रेटिंगच्या तोडीची कामगिरी केली. २७८२ एलो रेटिंग असलेल्या आनंदची कामगिरी केवळ २६५३ रेटिंग तोडीची झाली. याचबरोबर त्याला १५ एलो रेटिंगचा फटका बसला. जुलै २००० ते जुलै २०१२ अशी सलग १२ वर्षे तो पहिल्या पाच जणांत कायम होता.

त्यानंतर जानेवारी २०१६ पासून मात्र त्याला पहिल्या पाच जणांत स्थान मिळविता आलेले नाही. या कामगिरीमुळे आनंद लाइव्ह रेटिंगमध्ये पहिल्या दहा जणांमधून बाहेर गेला. त्याचा क्रमांक ११वा आहे. २०१४च्या लंडन क्‍लासिकमध्ये तो अंतिम क्रमवारीत आनंद विजेता होता, तर कॅरुआना शेवटच्या क्रमांकावर होता. त्या स्पर्धेतून कार्लसनने माघार घेतली होती. तेव्हा आनंदविरुद्धची जगज्जेतेपदाची लढत नजीक आल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला होता.

निकाल - इयन नेपोमियांछी बरोबरी वि. मॅक्‍झीम वॅचीएर-लॅग्रेव. विश्वनाथन आनंद पराभूत वि. वेस्ली सो. सर्जी कर्जाकीन बरोबरी वि. हिकारु नाकामुरा, फॅबीयानो कॅरुआना विवि मायकेल ॲडम्स. लेव्हॉन अरोनियन पराभूत वि. मॅग्नस कार्लसन. अंतिम क्रमवारी - १) कॅरुआना-नेपोमियांछी, ३) कार्लसन-मॅक्‍झीम-वेस्ली, ६) नाकामुरा, ७) अरोनियन, ८) कर्जाकीन, ९) आनंद, ॲडम्स.

वाढदिवशी पराभव
आनंदचा ११ डिसेंबरला ४८ वा वाढदिवस होता. त्या दिवशी त्याला अखेरच्या फेरीत पराभूत व्हावे लागले. संपूर्ण स्पर्धेत आनंदला एकही विजय मिळविता आला नाही. तो नेपोमियांछी, कॅरुआना आणि वेस्ली यांच्याकडून हरला. इतर सहा डाव बरोबरीत सुटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com