सत्येंद्रच्या सुवर्णवेधाने राष्ट्रकुल मोहिमेची सांगता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मुंबई - सत्येंद्र सिंगने भारताच्याच संजीव राजपूतला मागे टाकत राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ब्रिस्बेनला झालेल्या या स्पर्धेत भारताने एकंदर सहा सुवर्णपदकांसह वीस पदकांची घवघवीत कमाई केली.

स्पर्धेच्या सांगतादिनी झालेल्या स्पर्धेत सत्येंद्र, संजीवप्रमाणेच चैन सिंगही अंतिम फेरीस पात्र ठरला होता. पात्रता फेरीत सत्येंद्र ११६२ गुणांसह अव्वल होता; तर प्रत्येकी ११५८ गुणांसह संजीव तिसरा आणि चैन सिंग चौथा होता. अंतिम फेरीत सत्येंद्रला अनुभवी संजीव सातत्याने आव्हान देत होता. अखेर सत्येंद्रने (४५४.२) चुरशीच्या स्पर्धेत संजीवला (४५३.३) मागे टाकले. सुरवातीस चैन सिंग तिसऱ्या क्रमांकावर होता, त्यामुळे भारताच्या निर्विवाद वर्चस्वाची अपेक्षा होती; पण ऑस्ट्रेलियाच्या डेल सॅम्पसनने १२ शॉटस्‌नंतर चैनवर घेतलेली आघाडी कायम राखली.

पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत बिरेंदर सोधीला अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्याचेच समाधान लाभले. या स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सात ब्राँझपदकांसह वीस पदके जिंकली.