क्रिकेटमधील बदलांवर शिक्कामोर्तब

क्रिकेटमधील बदलांवर शिक्कामोर्तब

दुबई - क्रिकेटच्या नियमात मोठ्या बदलांची अंमलबजावणी गुरुवारपासून (ता.२८) होत आहे. फलंदाजांबरोबर गोलंदाजांनाही समान संधी मिळण्यापासून मैदानावरच्या शिस्तीपर्यंत हे सर्व बदल आहेत. हे नियम काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आले होते. आयसीसीने त्यास मंजुरी दिल्यानंतर आणि एलिट पंचांचे वर्कशॉप घेतल्यानंतर त्यांची अंमलबावणी होणार आहे.

मैदानावर पंचांशी हुज्जत घालण्याचे आणि कधी कधी मैदानावरच प्रतिस्पर्धी खेळाडूंबरोबर बाका प्रसंग उभा करून खेळाची शिस्त मोडल्यामुळे रेड कार्ड दाखवून बेशिस्त खेळाडूंना मैदानाबाहेर काढण्याचे नियम फुटबॉलमध्ये आहेत. असाच नियम आता क्रिकेटमध्येही असेल. त्यामुळे शीघ्रकोपी खेळाडूंना आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

बॅटच्या जाडीवर निर्बंध
क्रिकेट हा फलंदाजांना अधिक प्राधान्य मिळणारा खेळ झाला आहे. त्यातच काही खेळाडू जाडजूड बॅट वापरत होते. आता बॅटच्या बुंध्याची जाडी ४० मि.मी.पेक्षा अधिक आणि रुंदी ६७ मि.मी.पेक्षा अधिक असणार नाही.

डीआरएस कोटा अबाधित
पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याच्या नियमात (डीआरएस) जर निर्णय आपल्या विरोधात गेला, तर कोटा (२) संपत असतो (कसोटी सामन्यात ८० षटकांपर्यंत) आता निर्णय चुकला तरी कोटा संपणार नाही. तसेच ट्‌वेन्टी-२० सामन्यांतही डीआरएस लागू करण्यात येणार आहे.

...तरीही धावचीत नाही
धावचीतच्या जुन्या नियमानुसार जर फलंदाजाची बॅट क्रीजच्या वर असेल आणि त्याच वेळी चेंडू यष्टींना लागला, तर तो फलंदाज धावचीत असायचा. आता तसे नसेल. चेंडू यष्टींना लागेल त्या वेळी जर बॅट क्रीजच्या वर असली (जमिनीला लागलेली नसेल तरी) तरीही तो फलंदाज धावचीत नसेल.

सीमारेषेच्या आत झेल
सीमारेषेजवळ पकडण्यात येणाऱ्या झेलांबाबत अधिक स्पष्टता नव्या नियमात आणण्यात आली आहे. सीमारेषेच्या वर असलेला झेल पकडण्यासाठी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडण्यापूर्वी त्याची मारलेली उडी सीमारेषेच्या आतून असली पाहिजे; तरच तो झेल वैध धरला जाईल. कधी कधी सीमारेषेवर उंच असलेला झेल पकडण्यासाठी सीमारेषेबाहेरून उडी मारून झेल पकडला जातो आणि मग तो फलंदाज मैदानात येतो. असे केल्यास तो झेल वैध नसेल आणि त्या ठिकाणी चार धावा दिल्या जातील. तसेच प्रतिस्पर्धी संघातील क्षेत्ररक्षक किंवा यष्टिरक्षकाच्या हेल्मेटला लागून चेंडू उडला असेल, तर अशा चेंडूवर फलंदाज झेलचीत, यष्टिचीत किंवा धावचीत होऊ शकतो.

ऑस्ट्रेलिया-भारत मालिकेत  जुनेच नियम
आयसीसीच्या या नव्या नियमांची अंमलबजावणी गुरुवारपासून करण्यात येणार असली, तरी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका अगोदरच सुरू झालेली असल्यामुळे जुन्या नियमानेच ही मालिका खेळण्यात येईल, असे आयसीसीने स्पष्ट केले.

कसोटी क्रिकेटमध्ये झालेले बदल
प्रत्येक संघात सहा राखीव खेळाडू (यापूर्वी चार)
नव्या परिमाणानुसारच बॅट आवश्‍यक, पंच तपासणी करणार
यष्टींवरील बेल दोरीने जोडली जाणार. या पद्धतीचा उपयोग यजमान क्रिकेट मंडळावर अवलंबून
दिवसातील सत्र संपण्यापूर्वी तीन मिनिटे आधी विकेट पडल्यास ब्रेकचा निर्णय (यापूर्वी दोन मिनिटे)
गोलंदाजाने चेंडू टाकल्यावर पॉपिंग क्रीझमध्ये पोचण्यापूर्वी एक टप्पा पडला तरी नो-बॉल (यापूर्वी दोन टप्पे)
नो-बॉलवर बाईज किंवा लेगबाइज धाव झाल्यास त्या वेगवेगळ्या मोजणार. म्हणजे नो-बॉल गोलंदाजाच्या नावावर आणि त्या चेंडूवर निघालेल्या धावा अवांतर म्हणून मोजणार. (यापूर्वी अशा धावा नो-बॉलमध्येच मोजल्या जायच्या)
चेंडू क्षेत्ररक्षक किंवा यष्टिरक्षकाच्या हेल्मेटला लागून उडाल्यास फलंदाज झेलबाद, धावबाद किंवा यष्टिचित म्हणून बाद धरणार
चेंडू हाताळणे संकल्पना रद्द, ती क्षेत्ररक्षणात अडथळा अंतर्गत सामावली जाणार
मैदानावरील असभ्य वर्तनासाठी पंच खेळाडूस थेट रेड कार्ड दाखवू शकणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com