‘मिशन कांगारू’ फत्ते करण्याचा निर्धार

पीटीआय
रविवार, 24 सप्टेंबर 2017

उपखंडातील खेळपट्ट्यांशी जुळवून घ्यावे लागते. वरिष्ठ खेळाडू वारंवार येथे खेळत असल्यामुळे त्यांना परिस्थितीची कल्पना असते. चौकार कसे मारायचे आणि स्ट्राइक कशी रोटेट करायची हे त्यांना समजले पाहिजे.
- डेव्हिड वॉर्नर

इंदूर -  मनगटाने चेंडू फिरवणाऱ्या (रिस्ट स्पिनर) फिरकी गोलंदाजांची दहशत बसवून ऑस्ट्रेलियाची नाकेबंदी केल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेची मोहीम उद्याच फत्ते करण्याच्या तयारीत आहे, तर परदेशात सलग १० वा सामना गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या खाईतून बाहेर कसे पडायचे आणि मालिका कशी वाचवायची याचे उत्तर शोधायचे आहे.

होळकर मैदानावर उद्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा सामना होत आहे. पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असेल. इंदूरचा हा इतिहास कांगारूंना नवी उमेद देणारा ठरू शकेल; परंतु आत्मविश्‍वास वाढलेल्या आणि खेळपट्टी साथ देणारी नसली तरी मनगटावर चेंडू फिरवण्याची क्षमता असलेला कुलदीप आणि यझुवेंदर ही नवी जोडी पुन्हा एकदा भारी ठरू शकेल.

कधीही हार न मानणे ही ऑस्ट्रेलियन वृत्ती; पण भारतात पाऊल ठेवल्यानंतर जडेजा-अश्‍विनऐवजी समोर आलेले यादव-चाहल यांचे कोडे त्यांना सोडवता आलेले नाही. त्यातच भुवनेश्‍वर कुमारचे अर्धवर्तुळाकार स्विंग आणि बुमराहची अचुकता डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथसारख्या कसलेल्या फलंदाजांची पंचाईत करत आहेत. भारतासाठी चिंतेची बाब आहे ती मनीष पांडे आणि केदार जाधव या मधल्या फळीच्या अपयशाची. चेन्नई आणि कोलकात्यात पांडे हजेरी लावूनच परतला; मात्र आश्‍वासक सुरवातीनंतर केदारने विकेट बहाल केली होती.