टीम इंडियाला सरावाचा नवा शास्त्रीमंत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

कोलंबो  -मार्गदर्शकपदाच्या आपल्या दुसऱ्या खेळीत रवी शास्त्री यांनी सामन्याच्या पूर्वतयारीत बदल केला आहे आणि त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यांनी फलंदाजीस उतरण्यापूर्वी खेळाडूंना वॉर्मअप करण्याची सवय लावली आहे. 

कोलंबो  -मार्गदर्शकपदाच्या आपल्या दुसऱ्या खेळीत रवी शास्त्री यांनी सामन्याच्या पूर्वतयारीत बदल केला आहे आणि त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यांनी फलंदाजीस उतरण्यापूर्वी खेळाडूंना वॉर्मअप करण्याची सवय लावली आहे. 

गॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी शास्त्री यांनी शिखर धवन आणि अभिनव मुकुंद या सलामीच्या जोडीला अन्य संघांपूर्वीच मैदानात पाठवले. भारताची प्रथम फलंदाजी आल्यास, त्यासाठी तुम्ही तयार असावे, असेच त्यांना सांगण्यात आले होते. त्यात फलंदाजीच्या क्रमानुसार स्वतःला तयार करणे यावर भर होता. त्यामुळे धवन-मुकुंद त्यांचा सराव संपवून, तसेच कुल डाऊन होऊन परत येईपर्यंत पुजाराचा सराव संपला होता आणि कोहलीचा सराव सुरू झाला होता. 

पहिल्या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी केली आणि त्याचा फायदा सलामीच्या जोडीस विशेषतः धवनला झाला, याकडे संघव्यवस्थापन लक्ष वेधत आहे आणि हेच पुजाराबाबत घडले, असे सांगितले जात आहे. 

कुंबळे यांची प्रशिक्षणाची पद्धत पारंपरिक, तसेच काहीशी पुस्तकी होती. शास्त्री यांनी सुरवातीसच खेळाचा आनंद घ्यायला सांगितला, जागतिक क्रमवारीतील अव्वल संघास साजेसा खेळ हवा, असे सांगितले. मात्र त्याच वेळी त्यांनी आपल्याला संघाकडून काय हवे, हे स्पष्ट केले आहे. 

राहुल नक्कीच खेळणार
भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही महिन्यांपासून मूळ संघातील खेळाडू तंदुरुस्त होऊन परतल्यास त्याची जागा त्याला परत देण्याचा अलिखित नियम केला आहे. त्यामुळेच करुण नायरला काही महिन्यांपूर्वी अजिंक्‍य रहाणेसाठी आपली जागा खाली करून  देणे भाग पडले होते. आता त्याच नियमानुसार तंदुरुस्त राहुल दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, फक्त तो धवनची जागा घेणार की मुकुंदची, हा प्रश्‍न आहे. आता काहींच्या मते, या दौऱ्यासाठी निवडलेल्या मूळच्या संघात मुकुंद होता. त्यामुळे धवनने राहुलची जागा घेतली आहे. त्यामुळे त्याला संघाबाहेर जावे लागेल, असेही सांगितले जात आहे.