कोल्हापूरच्या ध्रुवला दोन करंडक

मुकुंद पोतदार
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

श्रीपेरंबुदूर - राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेत मुंबईच्या सौरव बंदोपाध्याय आणि कोल्हापूरच्या ध्रुव मोहिते या महाराष्ट्राच्या ड्रायव्हरनी लक्षवेधी कामगिरी केली. सौरवने रविवारी पहिल्या शर्यतीत दुसरा क्रमांक मिळविला. ध्रुवने दोन्ही शर्यतींत तिसरा क्रमांक पटकावत गुणतक्‍त्यातील दुसरे स्थान कायम राखले. दोन्ही शर्यती करमिंदर सिंगने जिंकल्या. गतवर्षी ज्युनिअर विजेता ठरलेल्या जीत जाबाखने मोसमात प्रथमच दुसरा क्रमांक मिळविला.

मद्रास मोटर स्पोर्टस क्‍लबच्या ट्रॅकवर शनिवारच्या पावसामुळे रविवारच्या दोन्ही शर्यतींसाठी एका फेरीचे अंतर नेहमीच्या ३ किलोमीटर ७४ मीटरएवजी दोन किलोमीटर दहा मीटर इतके होते. पहिल्या शर्यतीत करमिंदरने सातव्या क्रमांकावरून घोडदौड केली. ध्रुवने चौथ्या क्रमांकावरून प्रगती केली. जीतने सुद्धा प्रगती करीत दुसरा क्रमांक मिळविला.

दुसऱ्या शर्यतीत बंदोपाध्याय पोल पोझिशनवर होता, पण त्याला ट्रॅकवर सांडलेल्या ऑईलमुळे नियंत्रण राखता आले नाही. याचा फायदा घेत करमिंदरने आघाडी घेतली. ध्रुवने पाचव्या क्रमांकावरून प्रारंभ केला. त्याने सुरवातीलाच एक क्रमांक प्रगती केली. मग त्याने तिसऱ्या क्रमांकापर्यंत वाटचाल केली. संदीप कुमार पहिल्या शर्यतीत चौथा आला, तर दुसऱ्या शर्यतीत कार भरकटल्याचा फटका त्याला बसला. त्यामुळे त्याची गुणतक्‍त्यात पीछेहाट झाली.

या फेरीनंतर करमिंदर सर्वाधिक ३८४ गुणांसह आघाडीवर आहे. ध्रुव २८० गुणांसह दुसरा, तर बंदोपाध्याय २५८ गुणांसह तिसरा आहे. ध्रुवने सांगितले की, कमी अंतराच्या फेरीमुळे छोटीशी चूक करूनही चालणार नव्हते. त्यामुळे दोन्ही शर्यतींत पोडियम फिनिशवर (पहिले तीन क्रमांक) भर दिला.
बंदोपाध्यायने शनिवारच्या तुलनेत टायरची ग्रिप मिळू शकली नाही असे सांगितले, तसेच दुसऱ्या शर्यतीत करमिंदरच्या धूर्त ड्रायव्हिंगचे कौतुक केले. फोक्‍सवॅगन मोटरस्पोर्टस इंडियाचे प्रमुख शिरीष विस्सा म्हणाले की, आज पहिली शर्यत चुरशीची झाली. बहुतेक स्पर्धक वेळेत सुधारणा करीत आहेत. ते रेसिंगचे कौशल्य आत्मसात करताना वेगवान ड्रायव्हिंगचा आनंद लुटत आहेत.  दुसऱ्या शर्यतीत गोकार्टींगप्रमाणे चित्र दिसले. एखादा स्पर्धक थोडा चुकताच त्याला ओव्हरटेक केले जात होते.