चाहते मालीसोबत; पण सरशी स्पेनची

चाहते मालीसोबत; पण सरशी स्पेनची

नवी मुंबई- विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील ब्राझील- इंग्लंड उपांत्य लढतीस लाभलेल्या विक्रमी प्रतिसादाची चर्चा सुरू असतानाच नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवरील माली- स्पेन लढतीसही चाहत्यांनी विक्रमी प्रतिसाद दिला; पण यात सरशी झाली ती पारंपरिक टीका-टाका हा पासेसवर भर देणारा खेळ यशस्वी केलेल्या स्पेनची. स्पेनने ३-१ असा विजय मिळविला. आता युरोपीय स्पर्धेप्रमाणेच स्पेन आणि इंग्लंड विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील विजेतेपदासाठी लढतील.

गुवाहाटीऐवजी कोलकत्यात झालेल्या ब्राझील- इंग्लंड उपांत्य लढतीचा प्रतिसाद विक्रमी होता, त्या तुलनेत माली- स्पेन सामन्याची फारशी चर्चाही नव्हती; पण अमेरिका- कोलंबिया या अखेरच्या साखळी सामन्यास लाभलेल्या २८ हजार चाहत्यांच्या तुलनेत आज लाभलेला सुमारे ३९ हजार चाहत्यांचा प्रतिसाद विक्रमीच म्हणता येईल. 

टीका-टाका प्रभावी 
छोटेछोटे पास देत प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणण्याची स्पेन रणनीती मालीच्या आक्रमक खेळापेक्षा चांगलीच भारी पडली. त्यांचे आणि मालीचे चेंडूवरील वर्चस्व सारखेच होते; पण स्पेन नेमबाजीत तसेच गोलक्षेत्रातील वर्चस्वात जास्त सरस होते. स्पेनचे गोलचे प्रयत्न मालीच्या तुलनेत खूपच कमी (१०-२९) होते, पण स्पेनचे दहापैकी सात शॉट्‌स ऑन टार्गेट होते, तसेच त्यांनी मालीचे नऊचे गोलचे प्रयत्न अपयशी ठरवले. या स्पर्धेत सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसरा असलेला स्पेन कर्णधार ॲबेल रुईझ याने दोन 
गोल करीत स्पेनच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. स्पेनने ७१ व्या मिनिटास घेतलेली ३-० आघाडी तीन मिनिटांनी कमी करण्यात माली यशस्वी ठरले खरे; पण त्यापेक्षा जास्त यश त्यांना आले नाही. 

स्पेनने यापूर्वीच आम्ही आमचा खेळ करणार, प्रसंगी मालीस आमच्या पद्धतीने खेळ करावा लागेल हे सांगितले होते, तेच घडले. मालीने उत्तरार्धात पासवर जास्त भर देत स्पेनइतकेच पास केले, त्यामुळे स्पेनचे पासवरील वर्चस्व ३९०-३८७ झाले, पण स्पेनचे गोलक्षेत्रातील पासेसच्या यशाच्या जवळपासही माली पोचू शकले नाहीत, यानेच निकाल ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com