जगज्जेत्या जर्मनीची जादू कायम

पीटीआय
मंगळवार, 4 जुलै 2017

सेंट पीटर्सबर्ग (रशिया)  - जगज्जेत्या जर्मनीच्या तरुण रक्ताच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी धसमुसळा खेळ करीत प्रसंगी मारामारीही करीत असताना स्वतःला शांत ठेवले आणि त्याच जोरावर कॉन्फेडरेशन्स कप फुटबॉल स्पर्धेत बाजी मारली. भांडखोर चिली खेळाडूच्या चुकीमुळेच सामन्यातील निर्णायक गोल जर्मनीस करता आला.

सेंट पीटर्सबर्ग (रशिया)  - जगज्जेत्या जर्मनीच्या तरुण रक्ताच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी धसमुसळा खेळ करीत प्रसंगी मारामारीही करीत असताना स्वतःला शांत ठेवले आणि त्याच जोरावर कॉन्फेडरेशन्स कप फुटबॉल स्पर्धेत बाजी मारली. भांडखोर चिली खेळाडूच्या चुकीमुळेच सामन्यातील निर्णायक गोल जर्मनीस करता आला.

चिली मध्यरक्षक मार्सेलो डायझ याच्याकडून गोलक्षेत्रात असताना चेंडूवर नियंत्रण राखू शकला नाही. गोलरक्षक ब्राव्होदेखील गोलपोस्ट सोडून खूप पुढे आला होता. त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेत लार्स स्टिंडट्‌ याने निर्णायक गोल केला. चिलीने त्यांचा पारंपरिक बेधडक खेळ केला. त्यांच्या आर्तुरो व्हिडालची आक्रमणेही लक्षवेधी होती; पण सदोष नेमबाजीने त्यांचा घात केला. 

नाट्यमय लढतीत संधी दवडण्यात स्पर्धा झाली; तसेच बचावपटूंकडून अक्षम्य चुका झाल्या. खेळाडूंची धक्काबुक्की झाली. त्याहीपेक्षा वादग्रस्त ठरलेला एक व्हिडीओ जास्त चर्चेत राहील. चिली बचावपटू गोंझालो जारा याने टिमो वेर्नरला टचलाईनजवळ कोपर मारले. व्हिडिओ असिस्टंटने याकडे रेफरी मिलॉराड मॅझिक यांचे लक्ष वेधले; पण त्यांनी लालऐवजी पिवळे कार्ड दाखवले. काही वेळातच मॅझिक यांनी चिलीची पेनल्टीची मागणी फेटाळली. याबाबत वाद घालणाऱ्या एदुआर्दो व्हर्गास याला ताकीद दिली. 

जर्मनीने उपांत्य फेरीत मेक्‍सिकोविरुद्ध संधी साधतच बाजी मारली होती, हेच त्यांनी चिलीविरुद्ध केले. चिलीने चेंडूवर जास्त हुकमत (६६%-३४%) राखली. त्यांचे शॉटस्‌ (२२-८), शॉटस्‌ ऑन टार्गेट (८-३) तसेच कॉर्नर्स (९-४) जास्त होते; पण जर्मनीला आपण काय करीत आहोत, हे माहिती होते. चिली देत असलेल्या संधीचा फायदा घेत ते दडपण कायम ठेवत होते. 

अभेद्य जर्मनी
जगज्जेत्या जर्मनीने ही स्पर्धा प्रथमच जिंकली
विश्‍वकरंडकपाठोपाठ कॉन्फेडरेशन्स कप जिंकण्याचा पराक्रम
फुटबॉल इतिहासात कधीही कॉन्फेडरेशन्स विजेते जगज्जेते झाले नसल्यामुळे जर्मनीच्या पाठीराख्यांना काहीशी चिंता
जर्मनीने २१ वर्षांखालील युरोपीय स्पर्धेपाठोपाठ हे विजेतेपद जिंकले
आम्ही योजना मैदानात अमलात आणली. आम्ही आक्रमणास सुरवात केली. चेंडूवर हुकमत राखली, संधी निर्माण केल्या; पण बचावातील ती चूक, ते विरोधात गेलेले निर्णय... फुटबॉलमध्ये हे होतेच. आज कदाचित आमचा हरण्याचा दिवस असेल.
- जुआन अँतोनिओ पिझ्झी, चिली मार्गदर्शक

आम्ही चांगले लढलो. विजेतेपदावर आमचा हक्कच होता. स्पर्धेपूर्वी फारसा एकत्रित सराव नसतानाही मिळवलेले हे यश खूपच मोलाचे आहे. प्रत्येक विजेतेपद सारखेच महत्त्वाचे असते. नवोदित खेळाडूंच्या यशामुळे त्याचे मोल वाढले आहे. आता आम्ही एकत्रितपणे सुटीवर जाणार. ही ट्रॉफी घेऊन.
- ज्यूलियन ड्रॅक्‍सिएर, जर्मनी कर्णधार