विनेश, साक्षीची आघाडीनंतर हार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

भारतीय कुस्तीगिरांची निराशाजनक कामगिरी

मुंबई - भारतीय महिला कुस्तीगिरांनी जागतिक स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी निराशा केली. भारताच्या पदकाच्या प्रबळ दावेदार असलेल्या विनेश फोगट आणि साक्षी मलिकला व्यूहरचना चुकल्यामुळे पराभव ओढवून घ्यावा लागला.

भारतीय कुस्तीगिरांची निराशाजनक कामगिरी

मुंबई - भारतीय महिला कुस्तीगिरांनी जागतिक स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी निराशा केली. भारताच्या पदकाच्या प्रबळ दावेदार असलेल्या विनेश फोगट आणि साक्षी मलिकला व्यूहरचना चुकल्यामुळे पराभव ओढवून घ्यावा लागला.

विनेशने युक्रेनच्या ओक्‍साना लिवाच हिला १३-२ असे सहज हरवून छान सुरवात केली होती. एवढेच नव्हे, तर  अमेरिकेच्या व्हिक्‍टोरिया अँथनीविरुद्ध ४-० अशी भक्कम आघाडीही घेतली होती; पण त्यानंतर लढतीवर पकड जास्त घट्ट करण्यासाठी आक्रमकता सोडून तिने बचावात्मक खेळ केला. आगामी लढतींचा विचार करून ताकद राखून ठेवण्याची तिची व्यूहरचना तिलाच भोवली. एक गुण झटपट मिळवून प्रतिस्पर्धीवर दडपण आणण्याऐवजी तिने तिच्या खेळाला साजेसा बचावात्मक खेळ केला. अँथनीने ही संधी साधत झटपट गुण घेत बाजी मारली.

ऑलिंपिक ब्राँझपदक विजेती साक्षी मलिकला आत्मविश्‍वास महागात पडला. तिने ६० किलो गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या लुईस गेर्डा नेमेशविरुद्ध २-१ आघाडी घेतली. यामुळे तिने आपला विजय जणू गृहीतच धरला. यामुळेच तिला हार पत्करावी लागली. एक स्पर्धक जरी उभे राहण्याच्या स्थितीत असला, तरी ती झटापट उभे राहण्याच्या स्थितीत झाली, हे टीव्ही समालोचक लक्षात घेत नव्हते. लाल वर्तुळात कुस्ती गेल्यावर लुईसला दिलेला गुण योग्यच होता. साक्षीने संधी असताना हार पत्करली, अशी टिप्पणी अनुभवी कुस्ती मार्गदर्शक कृपाशंकर बिश्‍नोई यांनी केली. 

नवोदित कुस्तीगीर शीतल तोमर हिने रुमानियाच्या एस्त्रा दॉब्रे हिला चांगली लढत दिली; पण ती अनुभवात कमी पडली आणि तिला २-४ अशी हार पत्करावी लागली, तर नवज्योत कौरला ६९ किलो गटात मंगोलियाच्या नासाबुर्मा हिच्याविरुद्ध ५-१० अशा पराभवास सामोरे जावे लागले.