बॅडमिंटनचे सोनेरी दिवस कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

प्रणॉय - कश्‍यप यांच्यात अमेरिकन स्पर्धेची अंतिम लढत रंगणार

मुंबई - भारतीय बॅडमिंटनचा बहर अजूनही कायम आहे. पारुपली कश्‍यप व एच. एस. प्रणॉय या दोन भारतीयांमध्ये अमेरिका ओपन ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदाची लढत होईल. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये दोन भारतीयांत विजेतेपदासाठी लढत होण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे.

प्रणॉय - कश्‍यप यांच्यात अमेरिकन स्पर्धेची अंतिम लढत रंगणार

मुंबई - भारतीय बॅडमिंटनचा बहर अजूनही कायम आहे. पारुपली कश्‍यप व एच. एस. प्रणॉय या दोन भारतीयांमध्ये अमेरिका ओपन ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदाची लढत होईल. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये दोन भारतीयांत विजेतेपदासाठी लढत होण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे.

भारतीय बॅडमिंटनची हुकूमत आता आशियातून अमेरिकेत गेली आहे. ॲनाहेम (कॅलिफोर्निया) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत कश्‍यपने कोरियाच्या क्वांग ही हेओ याचे कडवे आव्हान १५-२१, २१-१५, २१-१६ असे परतवत भारतीयांतच लढत होणार हे निश्‍चित केले. ही लढत ६६ मिनिटे रंगली होती. त्यापूर्वी प्रणॉयने व्हिएतनामच्या तिएन मिन्ह गुयेन याचा २१-१४, २१-१९ असा दोन सरळ गेममध्येच पाडाव केला होता. पुरुष दुहेरीच्या उपांत्य लढतीत मनू अत्री - बी. सुमित रेड्डी यांना अव्वल मानांकित लु चिंग याओ व यांग पो हान यांच्याविरुद्ध १२-२१, २१-१२, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला. मनू - सुमीत गतवर्षीचे उपविजेते होते. 

द्वितीय मानांकित प्रणॉयने पंधराव्या मानांकित प्रतिस्पर्ध्यास ४० मिनिटांतच हरवले होते. जागतिक क्रमवारीत २३ व्या  असलेल्या प्रणॉयने प्रथमच माजी जागतिक ब्राँझपदक विजेत्यास हरवले. त्याने दुसऱ्या गेममध्ये १४-१८ अशा पिछाडीनंतर सलग चार गुण जिंकले होते. त्याने अखेरचे आठपैकी सात गुण जिंकले. 

कश्‍यपची खडतर लढती जिंकण्याची मालिका कायम राहिली. पहिला गेम गमावल्यावर त्याने हुकुमत घेतली. निर्णायक गेममध्ये त्याची १४-९ आघाडी एका गुणावर आली होती; पण त्याने सलग चार गुण जिंकत बाजी मारली.

भारतीयांत यंदाची तिसरी फायनल
सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेत बी. साई प्रणीत व समीर वर्मा (जानेवारी)
बी. साई प्रणीत व के. श्रीकांत यांच्यात सिंगापूर ओपन सुपर सीरिज (एप्रिल)
आता भारतीय प्रथमच अमेरिकेतील स्पर्धेत विजेता होणार.
यंदा भारतीयांनी चार ग्रां.प्रि. जिंकल्या आहेत. साईना नेहवाल (मलेशिया मास्टर्स - जानेवारी), पी. व्ही. सिंधू व समीर वर्मा (सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय, लखनौ), बी. साई प्रणीत (थायलंड ओपन - जून)
श्रीकांतने इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज, तसेच बी. साई प्रणीतने सिंगापूर सुपर सीरिज विजेतेपद जिंकले आहे.

दीर्घ कालावधीनंतर अंतिम फेरी गाठली याचा आनंद आहे. कोरियन प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची लढत सोपी नव्हती.  मला काहीशा मंदगती असलेल्या कोर्टशी जुळवून घेण्यास वेळ लागला. पण जम बसल्यावर मी हुकूमत मिळवली आणि विजय मिळविला.
- पारुपली कश्‍यप

आम्ही दोघेही एकमेकांचा खेळ पुरेपूर जाणतो. सरावातील आमची प्रत्येक लढत चुरशीची होते. भारतीयांत लढत होणे भारतीय बॅडमिंटनसाठी चांगलेच आहे; पण अजूनही आमची सर्वोत्तम कामगिरी झालेली नाही.
- एच. एस. प्रणॉय