जिम्नॅस्टिकमध्ये अजून एक ‘अरुणोदय’

Gymnastic-Competition
Gymnastic-Competition

मेलबर्न - येथे सुरू असलेल्या जिम्नॅस्टिक विश्‍वकरंडक स्पर्धेत वॉल्ट प्रकारात भारताच्या अरुणा बुद्दा रेड्डीने ब्राँझपदक जिंकून इतिहास घडवला. भारताची आणखी एक जिम्नॅस्ट प्रणिती नायकला सहावे स्थान मिळाले. अरुणाने दोन वॉल्टमध्ये सरासरी १३.६४९ गुणांची कमाई केली, तर सहावी आलेल्या प्रणितीचे १३.४१६ गुण झाले.

या प्रकारात स्लोव्हेनियाच्या तासा केस्लीफने १३.८ गुणांसह सुवर्ण, तर ऑस्ट्रेलियाच्या एमिली विथहेडने १३.६९९ गुणांसह रौप्यपदक जिंकले. 

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे होत असलेल्या या विश्‍वकरंडक जिम्नॅस्टिकमध्ये १६ देश सहभागी झाले आहेत. गेले दोन दिवस पात्रता स्पर्धा झाल्या आणि आज व उद्या (ता. २५) अंतिम सामने होत आहेत. कालच्या पात्रता स्पर्धेतून आशीष कुमार, राकेश कुमार पात्रा, अरुणा आणि प्रणिती मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले. पुरुषांच्या रिंगमध्ये आज राकेश पात्राला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आशीष कुमार व्हॉल्टमध्ये सहाव्या स्थानावर पात्र ठरला होता.

अशी झाली लढत
अंतिम लढतीत अरुणाने शानदार सुरवात केली. तिने ४.६०० ची कठीण श्रेणी निवडून सादरीकरणात ९.०६६ गुण मिळवले. त्यामुळे तिची १३.६६६ अशी गुणसंख्या झाली. दुसऱ्या प्रयत्नात तिने पहिल्या प्रयत्नाहून अधिक म्हणजेच ४.८००ची श्रेणी निवडली; पण यामध्ये तिला सादरीकरणाचे ८.८३३ गुणच मिळवता आले. त्यामुळे या दुसऱ्या प्रयत्नांतले तिचे १३.६३३ गुण झाले. परिणामी सरासरी १३.६४९ गुणांची झाली आणि तिला ब्राँझपदक मिळाले. 

२०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणारा आशीष कुमार जिम्नॅस्टिकमध्ये पदक मिळवणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला होता. त्यानंतर २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दीपा कर्माकर जिम्नॅस्टिकच्या नकाशावर चमकली होती. तिनेही ब्राँझपदकाची कमाई केली. २०१६च्या रिओ ऑलिंपिकसाठी पात्रतेचा दीपाने इतिहास घडवला होता. तिचे ब्राँझ थोडक्‍यात हुकले होते.

ही आहे अरुणा
मूळची हैदराबादची आठव्या वर्षांपासून जिम्नॅस्टिकला सुरवात
पाचव्या वर्षांपासून कराटे खेळायची; परंतु तिची लवचिकता पाहून कराटे प्रशिक्षकांनी जिम्नॅस्टिक्‍स करण्याचा सल्ला दिला
२०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली; परंतु वय १४ वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे तिला खेळता आले नव्हते
जिम्नॅस्टिक घडवण्यासाठी वडील नारायण रेड्डी यांनी घरही 
विकले होते
२०१२ मध्ये वडिलांचे निधन. त्यानंतर बहिणीचा मोठा आधार; तिनेच सर्व मदत केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com