भारताचा मालिका विजयाचा षटकार

पीटीआय
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

थोडक्यात वन-डे
हार्दिक पंड्याचे या वर्षातील चौथे अर्धशतक. सर्व खेळींचा स्ट्राइक रेट १०० च्या पुढे
घरच्या मैदानावर २०१४ नंतर भारताची वन डे मध्ये शतकी सलामी. त्या वेळी श्रीलंकेविरुद्ध कटकला धवन-रहाणेच्या २३१ धावा.
ऑस्ट्रेलियाने १ बाद २२४ नंतर पाच विकेट ६९ धावांत गमावल्या.
ॲरॉन फिंचचे परदेशातील तिसरे, तर आशियात पहिले शतक.
इंदौर मैदानावर या सामन्यासह झालेल्या सहाही सामन्यांत भारताचाच विजय. यात ५ वन-डे आणि १ कसोटीचा समावेश.

इंदूर - विजयी अश्‍वावर स्वार झालेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियालाही शरणागती स्वीकारण्यास भाग पाडले. सलग तिसरा विजय मिळवून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सलग सहा मालिका जिंकल्या. अशी कामगिरी यापूर्वी भारताकडून राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी केली होती.  भारताने हा सामना पाच गडी राखून  जिंकला. त्याच बरोबर एकदिवसीय क्रमवारीत दक्षिण अफ्रिकेला मागे टाकून पहिले स्थान पटकविले.

पहिल्या दोन सामन्यांनंतर आज फलंदाजीस उपयुक्त असलेल्या होळकर स्टेडियमच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडला; पण अर्थात यामध्येही भारतीयांची सरशी झाली. वेगात सुरवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची वाटचाल २९३ धावांत रोखल्यानंतर भारताने हे आव्हान ४७.५ षटकांत पार करताना ५ बाद २९४ धावा केल्या. रोहित शर्मा (७१) आणि अजिंक्‍य रहाणे (७०) यांची झंझावाती १३९ धावांची सलामी आणि त्यानंतर हार्दिक पंड्याची ७८ धावांची टोलेबाजी भारताच्या विजयाच्या पताका झळकावणारी ठरली.

या पराभवाबरोबर ऑस्ट्रेलियाने परदेशात सलग ११ सामने गमावले आहेत. शतकवीर ॲरॉन फिंच त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला तीनशेच्या पलीकडे मजल मारण्याची संधी होती; परंतु अखेरच्या काही षटकांत भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या वाटचालीला ब्रेक लावले.

२९४ धावांचे आव्हान तसे सोपे नव्हते; परंतु सूर सापडलेला रोहित शर्मा आणि रहाणे यांनी सहापेक्षा अधिक धावांच्या सरासरीने दिलेली सलामी ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर टाकणारी होती. या दोघांसह विराट आणि केदार बाद झाल्यावर पंड्याने टोलेबाजी करून ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना शरण आणले. त्याला या सामन्यात चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. 

त्यापूर्वी, वॉर्नर-फिंच यांना रोखण्यासाठी विराट कोहलीने चहलच्या रूपाने पहिला बदल केला; पण तोही निष्प्रभ ठरला. अखेर पंड्याने वॉर्नरच्या यष्टींचा वेध घेऊन पहिले यश मिळवून दिले; पण त्यानंतर आलेल्या स्टीव स्मिथने फिंचसह १५४ धावांची भागीदारी केली. तेव्हा कांगारू ३००च्या पलीकडे मजल मारणार, याचे संकेत मिळत होते. 

डावातील ३७ षटके संपली तरी भारतीय गोलंदाजांना अवघी एकच विकेट मिळाली होती; पण विराट सेनेच्या गोलंदाजांनी धीर कायम ठेवला होता. कुलदीप यादवने फिंचची १२४ धावांची खेळी संपुष्टात आणली. लगेचच त्याने स्मिथलाही माघारी धाडले. त्यानंतर चहलने धोकादायक मॅक्‍सवेलचा बळी मिळवला. एका धावेच्या अंतराने हे तीन खंदे फलंदाज बाद झाल्यावर भारतीयांनी धावांच्या गतीलाही वेसण घातली. 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ६ बाद २९३ (डेव्हिड वॉर्नर ४२, ॲरॉन फिंच १२४ -१२५ चेंडू, १२ चौकार, ५ षटकार; स्टीव स्मिथ ६३ -७१ चेंडू, ५ चौकार; मार्कस स्टॉईनिस २७, बुमरा२-५२; कुलदीप यादव २-७५) पराभूत वि. भारत ः ४७.५ षटकांत ५ बाद २९४ (अजिंक्‍य रहाणे ७०- ७६ चेंडू, ९ चौकार, रोहित शर्मा ७१- ६२ चेंडू, ६ चौकार, ४ षटकार, विराट कोहली २८, हार्दिक पंड्या ७८- ७२ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार, मनीष पांडे नाबाद ३६- ३२ चेंडू, ६ चौकार, कमिन्स २-५४).

Web Title: sports news india vs australia