साईना नेहवाल अखेर उपविजेती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

मुंबई - साईना नेहवालने तिच्या लौकिकाची झलक दाखवली; पण जागतिक क्रमवारीत सातत्याने प्रगती करीत असलेल्या तई झु यिंग हिचा धडाका रोखण्यास ती अपयशी ठरली. तब्बल पाच वर्षांचा तईविरुद्धचा विजयाचा दुष्काळ संपवण्याचे साईनाचे प्रयत्न इंडोनेशिया मास्टर्समध्येही विफल ठरले. 

मुंबई - साईना नेहवालने तिच्या लौकिकाची झलक दाखवली; पण जागतिक क्रमवारीत सातत्याने प्रगती करीत असलेल्या तई झु यिंग हिचा धडाका रोखण्यास ती अपयशी ठरली. तब्बल पाच वर्षांचा तईविरुद्धचा विजयाचा दुष्काळ संपवण्याचे साईनाचे प्रयत्न इंडोनेशिया मास्टर्समध्येही विफल ठरले. 

आकडेवारीच्या भाषेत बोलायचे झाले, तर साईना अवघ्या २६ मिनिटांत ९-२१, १३-२१ अशी पराजित झाली. पाच वर्षांपूर्वी, अगदी नेमके सांगायचे झाले तर १५ मार्च २०१३ या दिवशी साईनाने तईला दोन गेममध्ये हरवले होते. त्यानंतर सलग सात लढतींत साईना पराजित झाली आहे. त्यात तिला केवळ तीन गेमच जिंकता आले आहेत. दोन्ही गेममध्ये ब्रेकला तई ११-५ आघाडीवर होती. तिने साईनाला आघाडी कमी करण्याची संधी दिली नाही. नऊपैकी दोन मॅचपॉइंट वाचवल्याचेच समाधान साईनास लाभले. 

साईना व तिच्या मार्गदर्शकांसाठी तिच्या खेळातील कमालीचे चढउतार धक्कादायक होते. साईना ११-१८ पिछाडीवर असताना ती काय करू शकते हे दिसले. तईचा बेसलाइन ड्रॉप निर्णायक ठरणार, असे वाटत असतानाच साईनाने तो परतवला. तईने नेटजवळील शटल परतवले, त्या वेळी साईनाने गुण गमावला असेच वाटले होते; पण साईनाने नेटजवळ झेपावत छान क्रॉस कोर्ट फ्लिक मारला. तई चकित झाली, पण तिने हसत-हसत आपल्याला दिलासा दिला. पण साईनाचा सूर काही वेळातच हरपला. तिने दोन शॉटस्‌ बाहेर मारत प्रतिस्पर्धीस मॅचपॉइंट दिला आणि मग त्याचे विजयी गुणात रूपांतर साईनाच्या बाहेर मारलेल्या रॅलीनेच झाले. 

गुडघ्याच्या दुखापतीतून साईना परतली आहे. तिने सिंधू, रॅचनॉकला हरवले आहे; पण ताईचे कोडे अद्याप तिच्यासाठी अवघडच झाले. ऐनवेळी शटलचा वेग, तसेच दिशा ठरवण्याची ताईची खासियत साईनाची डोकेदुखी ठरली होती. त्यामुळे ड्रॉपची तयारी असताना डोक्‍यावरून शटल येत असे, तर अपेक्षाही नसतानाही क्रॉस कोर्ट विनरचा सामना करावा लागत होता. सामना सुरू झाल्यावर पाच मिनिटांतच साईनाची पिछाडी ३-११ झाली होती. खरं तर तिला कोर्टवरील ड्रीफ्टचा अंदाजच आला नाही, तिने जवळपास पंधरा गुण शटलबाहेर गेल्याने गमावले. एकंदरीत एका वर्षानंतर खेळत असलेली अंतिम फेरी, तसेच त्यात दाखवलेली माफक चमक याचेच समाधान साईनास लाभले.

Web Title: sports news indonesia masters badminton competition