पुणेरी पलटण संघाचे पाऊल पडते पुढे

पुणेरी पलटण संघाचे पाऊल पडते पुढे

मुंबई - क्षणाक्षणाला पारडे बदलत राहिलेल्या सामन्यात पुणेरी पलटणने यूपी योद्धाचा ४०-३८ असा पराभव करून निर्णायक क्षणी मिळवलेली पकड कायम ठेवली आणि प्रो-कबड्डीतील एलिमिनेटरच्या पहिल्या सामन्यात सोमवारी थरारक विजय मिळवला.

प्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामातील पहिला बाद फेरीचा सामना कमालीचा चुरशीचा झाला. सुरवातीच्या ३-१० पिछाडीनंतर पुण्याने दोन गुणांच्या फरकाने मिळवलेला हा विजय निश्‍चितच त्यांची क्षमता आणि संयम दाखवणारा होता.

यूपीचा हुकमी कोपरारक्षक सागर कृष्णाला झालेली दुखापत आणि अखेरच्या दोन मिनिटांत सामना जवळपास बरोबरीत असताना नितीन तोमर आणि रिशांक देवाडिगा बाद झाले होते, त्यामुळे यूपीकडे चढाईसाठी भरवशाचा खेळाडू नव्हता. या संधीचा फायदा घेत पुण्याने निर्णायक घाव घातला. यूपीकडून रिशांक देवाडिगाचे नाणे खणखणीत वाजले. त्याने १५ गुणांची कमाई केली; परंतु मोक्‍याच्या क्षणी त्याच्या पकडी गिरीश एर्नाकने केल्या. त्याचाही फटका यूपीला बसला. रिशांक आणि मी भारत पेट्रोलियममधून खेळतो, त्यामुळे मला त्याचा खेळ माहीत आहे असे गिरीशने सामन्यानंतर सांगितले.

रिशांकच्या जबरदस्त सुरवातीच्या जोरावर यूपीने १०-३ अशी आघाडी घेतली, तेव्हा पुण्यावर दडपण येणार असे वाटत होते, परंतु राखीव खेळाडूही तेवढ्याच क्षमतेचे असल्याचे पुण्याने दाखवले. अक्षय जाधवने नितीन तोमरच्या दोन सुपर टॅकल केल्या. दुसऱ्या सुपर टॅकलच्या वेळी त्याने पुण्यावरील लोणचे संकट टाळले आणि तेथूनच पुण्याने प्रतिकार सुरू केला. मध्यांतराच्या १८-१८ बरोबरीनंतर पुण्याने ३३-२४ अशी आघाडी घेतली, पण या वेळी कलाटणी देणारा खेळ यूपीने केला; मात्र दोन मिनिटांत रिशांक आणि तोमर मैदानात नसल्याचा त्यांना फटका बसला. पुण्याकडून दीपक हुडाने १०, गिरीशने सात आणि अक्षयने सहा गुणांचे दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले.

प्रदीपचे गुणांचे त्रिशतक
गतविजेत्या पाटणाने हरियानाचा ६९-३० असा धुव्वा उडवला. आता एलिमिनेटर-३ लढतीत उद्या (ता. २४) पुणेविरुद्ध पाटणा, असा सामना होईल. प्रदीप नरवालने एकाच चढाईत सहा खेळाडू बाद करत हरियाना संघावर लोण दिला.  एकाच सामन्यात सर्वाधिक ३४ गुणांचा विक्रम करताना त्याने या मोसमात आतापर्यंत ३०८ गुण मिळवले.

सुरवातीला मोठी पिछाडी असली तरी चिंता नव्हती. माझा सर्व खेळाडूंवर भरवसा होता. एकदा का बरोबरी साधली, की सामन्यावर पकड मिळवण्याचा विश्‍वास होता.
- दीपक हुडा, पुण्याचा कर्णधार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com