राज्य कबड्डी निवडणूक एप्रिलच्या अखेरीस?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

मुंबई - राज्य कबड्डी संघटनेची बहुचर्चित निवडणूक एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत संघटनेच्या बैठकीनंतर मिळाले. या बैठकीत निवडणुकीच्या तारखेवरून वादविवाद झाले असल्याचे समजते. अखेर या निवडणुकीची तारीख ठरवण्याचा अधिकार अध्यक्ष किशोर पाटील यांना देण्यात आला.

मुंबई - राज्य कबड्डी संघटनेची बहुचर्चित निवडणूक एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत संघटनेच्या बैठकीनंतर मिळाले. या बैठकीत निवडणुकीच्या तारखेवरून वादविवाद झाले असल्याचे समजते. अखेर या निवडणुकीची तारीख ठरवण्याचा अधिकार अध्यक्ष किशोर पाटील यांना देण्यात आला.

राज्य कबड्डी संघटनेच्या शासकीय समितीची आज मुंबईतील मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत सभेच्या तारखेवरून मतभेद झाले. ही सभा फेब्रुवारीच्या अखेरीस घेण्याच्या प्रस्तावावरून कमालीचा वाद झाला. ‘निवडणूक कार्यक्रमाबाबत सखोल चर्चा होते. त्याबाबत मतभेद असू शकतात; पण ते बैठकीपुरतेच असतात. सर्व काही मुद्दे मांडण्यात आले. परीक्षांचा मुद्दा पुढे आला असल्याने अनेकांना सभेसाठी येता येणार नाही, असेही मांडण्यात आले. सर्व गोष्टी लक्षात घेण्यात येतील, तसेच घटनेचा अभ्यास करूनही निवडणुकीची तारीख ठरवण्याचे अंतिम अधिकार अध्यक्षांना देण्याचे ठरले’, असे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सांगितले. 

या बैठकीत फेब्रुवारीत निवडणूक घेण्याचा प्रस्ताव आल्यावर काही सदस्य आक्रमक झाले. त्यातच बैठकीचा प्रस्तावित दिवस शनिवार आहे, हे समजल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आणि विरोधाची धार तीव्र झाली. काहींनी थेट न्यायालयात जाण्याची धमकी दिली. संघटनेची मुदत एप्रिलपर्यंत असताना ही निवडणूक त्यापूर्वी कशी होते, हा मुद्दा जास्तच ताणला गेला. त्यावरून वातावरण तापलेही होते. अखेर हा निर्णय घटनेचा अभ्यास करून घेण्याचे ठरले. तो निर्णय अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे; मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही निवडणूक आता एप्रिलच्या अखेरीस आणि रविवारी होण्याबाबतचा निर्णय जवळपास झाला आहे. 

राष्ट्रीय कबड्डी विजेत्यास प्रत्येकी ५१ हजार
११ वर्षांनंतर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रास विजेतेपद मिळवून देणाऱ्या राज्य संघातील प्रत्येक खेळाडू, तसेच मार्गदर्शकांना प्रत्येकी ५१ हजारांचे बक्षीस देण्यात येईल. त्याशिवाय ब्लेझरही भेट देण्यात येणार आहे. याचबरोबर आशियाई विजेत्या भारतीय कबड्डी संघातील राज्यातील खेळाडू अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव यांनाही हे बक्षीस देण्यात येईल. या संघाचा सत्कार सोहळा २७ जानेवारीस बालेवाडीत होईल, असेही ठरले आहे. याचबरोबर फेडरेशन कबड्डी स्पर्धेसाठी राज्य संघाचे १५ दिवसांचे शिबिरही घेण्याचे ठरले आहे.

Web Title: sports news Kabaddi