इंग्लंडमध्ये आक्रमकता नव्हे; तर तंत्राला महत्त्व

पीटीआय
मंगळवार, 30 मे 2017

लंडन - चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत प्रथमच खेळत असल्यामुळे मी रोमांचित झालो आहे. येथील वातावरणात धडाकेबाज आक्रमकता चालणार नाही. त्यासाठी रणजी करंडक किंवा कसोटीप्रमाणे तंत्राला महत्त्व देऊन खेळावे लागेल, असे प्रतिपादन भारताचा फलंदाज केदार जाधव याने केले. 

केदारने आज पत्रकारांशी संवाद साधला. त्याला रविवारी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही; पण तरीही खूप काही शिकल्याचे नमूद करून तो म्हणाला, ‘‘फलंदाजांना प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागत होता. सतत बदलणाऱ्या हवामानात ते स्थिरावल्यासारखे वाटले नाहीत. खेळपटटीवर गवत होते. त्यामुळे चेंडू स्विंग होत होता. अशा परिस्थीतीत तुम्हाला आक्रमक खेळता येऊही शकेल; पण तंत्र महत्त्वाचे राहील. चांगले चेंडू सोडून द्यावे लागतील.’’ 

केदारने नेटमध्ये योजनाबद्ध सराव केला आहे. तो शरीर चेंडूच्या शक्‍य तितक्‍या जवळ नेऊन खेळण्याचा प्रयत्न तो करीत आहे. संघाची तयारी चांगली असल्याचे त्याने सांगितले. 

पाकविरुद्ध खेळण्याविषयी केदार म्हणाला की, व्यावसायिक क्रिकेटपटू असल्यामुळे आम्ही भावनांमध्ये गुंतत नाही. आम्ही सर्व प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सारख्याच चुरशीने खेळतो. वातावरणनिर्मिती प्रेक्षक करीत असतात. प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला असतो; पण आम्ही प्रत्येक प्रतिस्पर्ध्याकडे सारख्याच दृष्टीने बघतो.