मॅक्‍लोडच्या सुवर्णपदकाचा जमैकाला दिलासा

मॅक्‍लोडच्या सुवर्णपदकाचा जमैकाला दिलासा

लंडन - जागतिक मैदानी स्पर्धेत शंभर मीटर शर्यतीतील अपयशाने जमैकाच्या क्रीडाप्रेमींमध्ये निराशा आली होती. मात्र ऑलिंपिक विजेत्या ओमर मॅक्‍लोडने ११० मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आपल्या देशवासीयांना जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली. हातोडाफेकीतील विश्‍वविक्रमवीर पोलंडची अनिता व्लोडाझस्कीचे वाढदिवसाच्या एक दिवस आधी सुवर्णपदक, महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत केनियाला मिळालेले यश आणि स्पर्धेच्या इतिहासात व्हेनेझुएलाने जिंकलेले पहिले सुवर्णपदक चौथ्या दिवसाची अन्य वैशिष्ट्ये ठरली.

ओमर मॅक्‍लोडने भन्नाट प्रारंभ करताना १३.०४ सेकंदांत सुवर्णपदकाला गवसणी घातली. गतविजेता सर्गेई शुभेनकोव्हला १३.१४ सेकंदांत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उत्तेजक सेवनामुळे रशियावर बंदी असल्याने सर्गेई येथे तटस्थ ॲथलिट्‌ म्हणून सहभागी झाला. त्यामुळे रौप्यपदक जिंकल्यानंतरही त्याला आपल्या देशाचा ध्वज घेऊन आनंद साजरा करता आला नाही.  हंगेरीच्या बलाझ बायीने माजी ऑलिंपिक विजेत्या एरियस मेरीटला मागे ढकलून ब्राँझपदक जिंकले. आता मॅक्‍लोड जमैकासाठी रिले धावण्याची शक्‍यता आहे. 

पोलंडची विश्‍वविक्रमवीर, ऑलिंपिक विजेती अनिता व्लोडझस्की मंगळवारी ३२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सुवर्णपदकाच्या रूपाने तिला वाढदिवसाची उत्तम भेट मिळाली. यंदाच्या मोसमात विश्‍वविक्रम करणाऱ्या अनिताची सुरवात समाधानकारक नव्हती. मात्र तिने ७७.९० अंतरावर हातोडाफेकीत सुवर्णपदक जिंकलेच. चीनच्या झेंग वॅंगला (७५.९८ मी.) रौप्य आणि अनिताची सहकारी मालविना कोपर्नो हिला (७४.७६ मी.) ब्राँझपदक  मिळाले. महिलांच्या तिहेरी उडीतही बरीच चुरस पाहायला मिळाली. गतवर्षी रिओत कॅटरीन इबारगुनकडून पराभूत होणाऱ्या व्हेनेझुएलाच्या युलीमार रोजासने १४.९१ सेकंदांत सुवर्णपदक निश्‍चित केले. कॅटरीनला रौप्य (१४.८९ मी.) आणि माजी ऑलिंपिक विजेत्या कझाकिस्तानच्या ओल्गा रॅपकोव्हाला ब्राँझ (१४.७७ मी.) मिळाले. 

पंधराशे मीटरची शर्यत भन्नाट झाली. सुरवातीपासून आघाडीवर असलेल्या यजमान ग्रेट ब्रिटनच्या लौरा मुईरला पदक जिंकता आले नाही. यंदाच्या मोसमात वेगवान वेळ देणाऱ्या नेदरलॅंडच्या सिफात हसनचे डावपेच फसले आणि तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. केनियाच्या रिओ ऑलिंपिक विजेत्या फेथ किपेगॉन हिने अखेर बाजी (४ मि.०२.५९ सेकंद) मारली. माजी विजेत्या अमेरिकेच्या जेनीफर सिम्पसनने (४ मि.०२.७६ सें.) रौप्य आणि दक्षिण आफ्रिकेची वादग्रस्त धावपटू कॅस्टर सेमेन्याने (४ मि.०२.९० सें.) ब्राँझपदक जिंकले.

दृष्टिक्षेपात दिवस चौथा
११० हर्डल्समध्ये ऑलिंपिकपाठोपाठ विश्‍व विजेतेपद मिळविण्याची ही दुसरी वेळ. 
यापूर्वी ॲलन जॉन्सनने १९९६ च्या ऑलिंपिक आणि १९९७ च्या विश्‍व स्पर्धेत ही कामगिरी केली होती. 
हंगेरीच्या बलाझ बायीला हर्डल्समध्ये ब्राँझपदक. ट्रॅकवरील शर्यतीत हंगेरीचे हे पहिलेच पदक. 
तिहेरी कोलंबियाच्या कॅथरिन इबारगुनची २०१४ पासूनची विजयी मालिका खंडित
महिलांच्या पंधराशे मीटरमध्ये विश्‍वविक्रमवीर इथिओपीयाची गेन्झेबे दिबाबाला शेवटचे (१२) स्थान
तिहेरी उडीत युलीमार रोजासच्या सुवर्णपदकाने व्हेनेझुएलाने स्पर्धेत प्रथमच सुवर्ण आणि एकूण दुसरे पदक जिंकले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com