बोस्सेचा धक्कादायक निकाल

पीटीआय
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

लंडन -  आठशे मीटर शर्यतीत डेव्हिड रुडीशाच्या माघारीनंतर बोट्‌सवानाचा माजी ऑलिंपिक रौप्यपदकविजेता नायजेल ॲमोल आणि विश्‍व ज्युनिअर विजेता केनियाचा किपयेगॉन बेट यांच्यापैकी एक विजेता होईल, असे भाकीत करण्यात आले होते. मात्र, फ्रान्सच्या पिएरे बोस्सेने धक्कादायक निकाल नोंदवीत सुवर्णपदक जिंकले. चारशे मीटरमधील नाट्यमय घडामोडीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या विश्‍वविक्रमवीर वायदे व्हॅन निकर्कने सुवर्णपदक कायम राखले. तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत ऑलिंपीक विजेत्या कॉन्सेलस किपरुटोने सुवर्णपदक जिंकून या शर्यतीतील केनियाचे वर्चस्व अबाधिक राखले. 

आठशे मीटर शर्यत रंगतदार झाली. किपयेगॉन बेटने सुरवातीपासून आघाडी घेतली होती. नायजेल ॲमोस व माजी विजेता इथिओपियाचा महंमद अमान पाठोपाठ होते. शेवटच्या शंभर मीटरमध्ये पिएरेने (१ मि.४४.७६ सें) आघाडी घेतली. त्या वेळी त्याला कोणीही मागे टाकू शकले नाही. युरोपियन विजेत्या पोलंडच्या ॲडम क्रॅझॉटने (१ मि.४४.९५ सें.) अंतिम क्षणी मुसंडी मारीत रौप्यपदक पटकाविले. बेटला (१ मि.४५.२१ सें) ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. स्टीपलचेस शर्यतीत कॉन्सेलस किपरुटोला आव्हानच नव्हते. त्याने (८ मि.१४.१२ सें) अंतिम रेषा पार करण्यापूर्वीच जल्लोष सुरू केला होता. शर्यतीदरम्यान काही वेळ आघाडी घेणाऱ्या अमेरिकेच्या इव्हान जॅगरची (८ मि.१५.५३ से) ब्राँझपदकावर घसरण झाली. मोरोक्कोचा सौफीन इल्बाकली (८ मि.१४.४९ सें) रौप्यपदकाचा मानकरी ठरला. 

चारशे मीटर शर्यतीत सर्वांच्या नजरा वायदे व्हॅन निकर्कवर होत्या. मकवालाच्या अनुपस्थितीमुळे तसेही निकर्कपुढील आव्हान कमी झाले होते. ४३.९८ सेकंदात शर्यत पूर्ण केल्यावर निकर्कला काहीच अनपेक्षित वाटले नाही. त्याने फारसा जल्लोषही केला नाही. बहामाचा स्टीव्हन गार्डनर (४४.४१ सें) रौप्य तर कतारचा ज्युनिअर विश्‍वविजेता अब्देला हारुण (४४.४८ सें) ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. 

३६ वर्षीय बार्बरा विजयी
महिलांच्या भालाफेकीत ३६ वर्षीय बार्बराने स्पोटाकोव्हाने २००७ मध्ये सर्वप्रथम विश्‍वविजेतेपद तर बिजींग व लंडन ऑलिंपिक विजेतेपद मिळविले होते. येथे तिने केवळ प्रतिस्पर्ध्यावरच नव्हे, तर वयावर मात करीत (६६.७६ मीटर)  सुवर्णपदकाला गवसणी घातली. रौप्य व ब्राँझपदक चीनच्या वाट्याला गेले. पुरुषांच्या पोल व्हॉल्टमध्ये फ्रान्सचा माजी ऑलिंपिक विजेता रेनॉद लॅविनले यास (५.८९ मीटर) ब्राँझपदक मिळाले. यात अमेरिकेच्या सॅम केंड्रिक्‍सने (५.९५ मी.) सुवर्ण जिंकले.