महाराष्ट्राच्या टेनिसपटूंची सातत्यपूर्ण यशोमालिका

महाराष्ट्राच्या टेनिसपटूंची सातत्यपूर्ण यशोमालिका

पाठदुखीनंतरही ध्येयासक्त अर्जुनने प्रयत्नांकडे नाही फिरवली पाठ
पुणे - भारताच्या नव्या पिढीतील प्रतिभासंपन्न टेनिसपटू अर्जुन कढे याने भुवनेश्वरमधील आयटीएफ टेनिस स्पर्धेत पाठदुखीनंतरही वेदनाशामक इंजेक्‍शन घेत प्रयत्नांची पाठ नाही सोडली. त्यामुळे त्याने कारकिर्दीत एकेरीतील दुसरे आयटीएफ विजेतेपद पटकावले.

भुवनेश्वरला शनिवारी पार पडलेल्या स्पर्धेत अर्जुनने अंतिम सामन्यात एन. विजयसुंदर प्रशांत याला ६-३, ६-२ असे हरविले होते. शुक्रवारी दुहेरीत प्रशांतच्याच साथीत त्याला दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर रात्रभर तसेच सकाळी त्याची पाठ दुखत होती. त्यामुळे त्याला पाठिवर टेपिंग करून घ्यावे लागले. या पार्श्वभूमीवर अर्जुनसाठी सायंकाळी ४.३० वाजता अंतिम सामना सुरू होणे अनुकूल ठरले. अर्थात त्यामुळे त्याची पाठदुखी जादू होऊन बरी झाली नव्हती. वडील व प्रशिक्षक जयंत व आई रश्‍मी यांनी त्याला केवळ प्रयत्न करायचा सल्ला दिला.

याविषयी अर्जुनने सांगितले की, ‘‘दुहेरीच्या सामन्यातून जवळपास माघार घ्यावी लागेल अशी स्थिती होती. कारकिर्दीत मला यापूर्वी दुखापत झाली आहे, पण या वेळी तीव्रता जास्त होती. अशावेळी कोर्टवर उतरायचे. शक्‍य तेवढा प्रयत्न करायचा इतकेच ठरविले होते. आई-बाबांनी मला रिलॅक्‍स ठेवले. खूप पाठ दुखली तर सामना सोडून दे असे ते म्हणाले. त्यामुळे दडपण निघून गेले. दुखापती कारकिर्दीचा अविभाज्य भाग असतात. देवाच्या कृपेने मला सामना खेळताना बरे वाटले.’’ अर्जुन आक्रमक खेळ करतो. या वेळी त्याने धूर्तपणे तंत्रात बदल केला. वेगाऐवजी त्याने स्पीनवर (चेंडू रॅकेटने मारता कोन साधत प्रतिस्पर्ध्याला चकविणे) भर दिला. अर्जुनने गेल्या वर्षी व्हिएतनामधील स्पर्धा जिंकली होती. 

*****************************************

महिलांनाही सांघिक विजेतेपद
भिलाईत पार पडलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत महाराष्ट्राने दिल्लीचा २-० असा धुव्वा उडवीत विजेतेपद पटकावले. मिहिका यादवने रिषीका सुंकाराला ६-२, ७-६ (७-३) असे हरविले. त्यानंतर कर्णधार ऋतुजा भोसलेने प्रेरणा भांब्रीला ६-२, ७-५ असे हरविले. या कामगिरीबद्दल छत्तीसगढ टेनिस संघटनेचे अध्यक्ष व भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सहसचिव विक्रमसिंग सिदिया यांनी विजेत्या व उपविजेत्या संघाला प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले.

ऋतुजाशी संपर्क साधला असता ती म्हणाली, की आमच्यावर चांगल्या कामगिरीचे दडपण होते. मिहीकाने पहिला सामना जिंकल्यानंतर माझ्यावरील दडपण कमी झाले. प्रेरणाविरुद्ध मी पूर्वी आयटीएफ स्पर्धेत हरले होते, पण तो निकाल माझ्या मनातही नव्हता. आम्ही संघभावनेने खेळलो. स्नेहल आणि मी पीवायसी हिंदू जिमखान्यावर हेमंत बेंद्रे यांच्या ॲकॅडमीत सराव करतो. स्नेहलने मला प्रोत्साहन दिले. सर्व्हिससाठी ती मला काही टिप्स देत होती. अमेरिकेतील कॉलेज टेनिसचा फायदा झाला.

एमएसएलटीए संयोजन-प्रशिक्षण-सुविधा-संधी अशा पातळ्यांवर योजनाबद्ध प्रयत्न करीत आहे. गेल्या आठवड्यात पुरुष संघाने विजेतेपद मिळविले. त्यानंतर महिला संघाने एकही सेट गमावला नाही, यावरून महाराष्ट्र टेनिसची दर्जात्मक प्रगती अधोरेखित होते. हे यश समाधान देणारे आहे.
- सुंदर अय्यर,  राज्य सरचिटणीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com