ग्रासरुट पातळीसाठी स्पर्धा महत्त्वाची - मंदार ताम्हाणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

पुणे - ‘कोणत्याही खेळात ग्रासरुट पातळीपासून प्रारंभ करणे महत्त्वाचे असते. भारतात फुटबॉलच्या प्रसारासाठी योग्य वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेचे संयोजन महत्त्वाचे ठरेल,’ असे प्रतिपादन फुटबॉल तज्ञ मंदार ताम्हाणे यांनी केले.

पुणे - ‘कोणत्याही खेळात ग्रासरुट पातळीपासून प्रारंभ करणे महत्त्वाचे असते. भारतात फुटबॉलच्या प्रसारासाठी योग्य वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेचे संयोजन महत्त्वाचे ठरेल,’ असे प्रतिपादन फुटबॉल तज्ञ मंदार ताम्हाणे यांनी केले.

सकाळच्या संकेतस्थळावरील ‘लाइव्ह व्हिडिओ’साठी त्यांनी मुलाखत दिली. त्या वेळी त्यांनी भारतीय संघाच्या तयारीविषयी सांगितले की, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिषेक यादव संघाचा संचालक आहे. परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संघाची तयारी सुरू आहे. आपल्या संघाने युरोपमधील काही देशांचे दौरे करून तेथील क्‍लबच्या संघांविरुद्ध सामने खेळले आहेत. सुमारे दोन वर्षांपासून ही तयारी सुरू आहे. इतके सखोल नियोजन सुरू आहे. आपल्या महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यात पुढाकार घेतला. त्यांचे संघटन कौशल्य प्रेरणादायी ठरत आहे.’

या स्पर्धेच्या महत्त्वाविषयी ते म्हणाले की, ‘नेमार, कार्लोस तेवेझ असे अनेक खेळाडू प्रथम या स्पर्धेत चमकले. स्पर्धेचे स्वरूप वरिष्ठ गटाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या धर्तीवरच असते. त्यात सर्वोत्तम संघांचा सहभाग असतो. या स्पर्धेसाठी जगभरातील अनेक व्यावसायिक क्‍लबचे स्काउट भारतात येतील. ते वेगवेगळ्या केंद्रामधील सामने पाहतील. त्यातून प्रतिभासंपन्न खेळाडू हेरण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.’ भारताच्या संधीबाबत ते म्हणाले की, ‘वयोगट पातळीवरील खेळाडू थोड्याफार फरकाने सारख्याच क्षमतेचे असतात. त्यांची उपजत क्षमता सराव, पूर्वतयारीने विकसित होते. ही स्पर्धा आपण जिंकूच अशी अपेक्षा बाळगणे  योग्य नाही, पण सर्वोत्तम तयारीच्या जोरावर कामगिरी चांगली होईल असे नक्की सांगता येईल.’