तब्बल 42 वर्षानंतर भारताला सुवर्ण 

नरेश शेळके
शनिवार, 8 जुलै 2017

भुवनेश्‍वर : मुसळधार पाऊस असूनही उत्सुकता ताणल्या गेलेल्या पुरुषांच्या चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या महंमद अनस याने सुवर्णपदक मिळविले.

अनसच्या कामगिरीमुळे 42 वर्षांनंतर या शर्यतीमधील सुवर्णपदकाचा भारताचा दुष्काळ संपुष्टात आला. अमियाकुमार मलिक यामुळे अपात्र ठरलेला रिले चमू आणि सायंकाळी तो शंभर मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत अपात्र ठरल्यामुळे भारताला धक्का बसला होता. मात्र, अनसच्या सुवर्णपदकामुळे आलेली मरगळ काहीशी झटकली गेली. 

चारशे मीटरच्या अंतिम शर्यतीत भारताचे तीन स्पर्धक पात्र ठरले होते. त्यामुळे या शर्यतीत कोण आणि कुठले पदक जिंकणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. जोरदार पावसातही अखेरच्या दीडशे मीटरपासून राष्ट्रीय विक्रमवीर महंमद अनसने वेग वाढविला आणि 45.77 सेकंदात दिमाखात अंतिम रेषा पार केली. या शर्यतीत यापूर्वी 1975 च्या सेऊल स्पर्धेत श्रीराम सिंग यांनी भारतासाठी एकमेव सुवर्ण व पदकही मिळविले होते. त्यानंतरही चारशे मीटरमध्ये एकाही भारतीय धावपटूला पदक मिळविता आले नव्हते. अनसपाठोपाठ आरोक्‍य राजीवने 46.14 सेकंदात रौप्यपदक मिळवून आनंदात आणखी भर घातली. तिसरा भारतीय अमोल जेकबचे ब्रॉंझपदक थोडक्‍यात हुकले. 

महिलांच्या शर्यतीतही तीन भारतीयांचा समावेश होता. त्यात ऑलिंपियन निर्मलाने 52.01 सेकंदात सुवर्णपदक जिंकून 2007 नंतर भारताला या शर्यतीत यश मिळवून दिले. आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेच्या चारशे मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पाचवी भारतीय धावपटू ठरली. यापूर्वी पी. टी. उषा (1983 ते 1989), शायनी विल्सन (1991), मनजित कौर (2005) आणि चित्रा सोमण (2007) यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. उषाची शिष्या व ज्युनिअर आशियाई विजेती जिस्ना मॅथ्यूला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. तिने 53.32 सेकंद वेळ दिली. सुवर्णपदकामुळे अनस व निर्मला लंडन विश्‍व स्पर्धेसाठी पात्र ठरले.

नरेश शेळके