माझी योग्यता सिद्ध केली - रावत

माझी योग्यता सिद्ध केली - रावत

नवी दिल्ली - संशयाच्या धुक्‍यातून अखेर रविवारी दिल्ली अर्ध मॅरेथॉन पार पडली. परदेशी धावपटूंचे अपेक्षित वर्चस्व राहिले; पण भारतीय गटात विजेतेपद मिळविल्यावर नितेंद्रसिंग रावतने भारतीय क्रीडा महासंघावर टीका केली.

नितेंद्रसिंगने भारतीय गटात विजेतेपद मिळविले. त्यानंतर तो म्हणाला,‘‘विजेतेपद मिळवून मी योग्यता सिद्ध केली आहे. राष्ट्रीय शिबिरातून मला वगळणाऱ्या भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाला हे उत्तर आहे. लांबपल्ल्याच्या शर्यतीत देशात मी सर्वोत्तम आहे हे पुन्हा एकवार सिद्ध झाले. यातूनच महासंघाने काय तो बोध घ्यावा.’’

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी भारतीय महासंघाने रावतला वगळले आहे. त्यानंतरही रावत रानिखेत येथे आर्मीच्या केंद्रावर वैयक्तिक सराव करतो. रावतने १ तास तीन मिनीट ५३ सेकंद अशा विक्रमी वेळेत रेस जिंकल्यावर प्रतिक्रिया देताना महासंघावर टीका करणे सोडले नाही. तो म्हणाला,‘‘राष्ट्रीय शिबिरातून वगळण्याबाबत महासंघाने मला कोणतेही कारण दिलेले नाही. त्यानंतरही निराश न होता वैयक्तिक सराव करून आपण हे विजेतेपद मिळवून दाखवले. 

या संदर्भात भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाचे सचिव सी. वॉल्सन यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘रियो ऑलिंपिक आणि त्यानंतर वर्षभर रावतच्या कामगिरीत सातत्य नव्हते. प्रशिक्षकांनीच सांगितल्यामुळे त्याला वगळण्यात आले.’’

इथियोपियाचे वर्चस्व
या शर्यतीत इथियोपियाचे वर्चस्व राहिले. पुरुष विभागात दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविताना बेऱ्हानू लिगसे याने ५९.४६ सेकंद अशी वेळ दिली. दुसऱ्या विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना त्याने दिल्लीतील हवामानाचे कौतुक केले. तो म्हणाला,‘‘या कामगिरीने मी खूष झालो आहे. येथील हवामान खूप छान होते. त्याचा इतका बाऊ कशाला केला गेला माहीत नाही. मॅरेथॉनसारख्या शर्यतींना असेच हवामान योग्य असते.’’ यंदा प्रथमच धावणारा त्याचा सहकारी अँडामाल्क बेलिहू (५९.४६ मिनीट) केवळ सहा सेकंदांने दुसऱ्या स्थानावर राहिला. अमेरिकेचा लिओनार्ड कोरीर (५९.२२ मिनीट) तिसरा आला. विशेष म्हणजे पहिल्या तीनही धावपटूंनी एका मिनिटाच्या आत शर्यत पूर्ण केली.

महिलांमध्ये पहिले तीनही क्रमांक इथियोपियाच्या धावपटूंनी मिळविले. जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या अल्माझ अयानाने १ मिनिट ७.११ सेकंद अशी वेळ देत विजेतेपद मिळविले. पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली ॲबाबेल येशानेह या वेळी केवळ (१ मिनीट ७.१९ सेकंद) शतांश सेकंदाने मागे राहिली. त्यांचीच सहकारी नेटसॅनेट गुडेटा तिसऱ्या स्थानावर राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com