रौप्यपदकावर समाधानी, पण हरल्याचे दुःख आहेच - सिंधू

पीटीआय
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

भारतीय म्हणून मला नेहमीच अभिमान वाटतो. या वेळी जागतिक स्पर्धेत तर एकाचवेळी दोन भारतीय खेळाडू विजयमंचावर होते. मला रौप्य, तर साईनाला बाँझपदक मिळाले. साईनाही चांगली खेळली. भारतासाठी एकाच स्पर्धेत आम्ही दोन पदके आणली याचा मला अभिमान वाटतो.
- पी. व्ही. सिंधू

ग्लासगो - रियो ऑलिंपिकनंतर बरोबर एक वर्षांनी भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. लढतीनंतर बोलताना सिंधूने जागतिक रौप्यपदकाचा आनंद निश्‍चित आहे, पण हरल्याचे शल्य मनात कायम राहणार, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

जागतिक अजिंक्‍यपद लढतीत तब्बल ११० मिनिटे प्रतिकार केल्यानंतर सिंधूला जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध हार मानावी लागली. विशेष म्हणजे रियोत ऑलिंपिक ब्राँझपदक विजेती असणाऱ्या ओकुहाराने जागतिक विजेतेपद मिळविताना उपांत्यपूर्व फेरीत ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिन मरिन आणि विजेतेपदाच्या लढतीत रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. या सगळ्या प्रवासाविषयी सिंधू पत्रकार परिषदेत मोकळेपणाने बोलली. 

अंतिम सामन्याविषयी
ओकुहारा ही नक्कीच सोपी प्रतिस्पर्धी नव्हती. त्यानंतरही तिच्याविरुद्ध झालेली लढत खूपच सर्वोत्तम ठरली. सुरवातीपासून अखेरपर्यंत कुणी जिंकू शकेल अशीच स्थिती होती. त्यात ओकुहाराने बाजी मारली. यानंतरही जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्याचा आनंद नक्कीच आहे; पण हरल्याने निराश देखील आहे. दोघींसाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा होता. दोघी शटल सोडण्यास तयार नव्हतो.  त्यामुळे प्रदीर्घ रॅलीज झाल्या. निर्णायक गेममध्ये २०-२० अशा स्थितीत कुणीही जिंकू शकत होते. दोघींचेही सुवर्णपदकाचे उद्दिष्ट होते. त्या एका शेवटच्या क्षणाचे सगळे चित्र बदलले. 

प्रदीर्घ रॅलीबाबत
दुसरी गेम सिंधूने जिंकली तेव्हाची रॅली तब्बल ७३ शॉट्‌सची झाली. या विषयी सिंधू म्हणाली,‘‘ती एकच रॅली प्रदीर्घ झाली असे मला वाटत नाही. आमची प्रत्येक रॅली प्रदीर्घच झाली. दोघी सारख्याच दमलो होतो. दोघींनाही सुवर्णपदक खुणावत होते. एकूणच अंतिम लढत सर्वोत्तम अशीच झाली; पण कालचा दिवस माझा नव्हता हे नक्की.

तंदुरुस्तीविषयी
खेळ कुठलाही असो शारीरिक तंदुरुस्ती तेवढीच महत्त्वाची असते. ही लढत तिसऱ्या गेमला गेली तेव्हा तंदुरुस्तीचा खऱ्या अर्थाने कस लागला. जागतिक स्पर्धेची अंतिम लढत असल्याने दोघीही प्रत्येक गुणासाठी झटत होतो. प्रत्येक गुण महत्वाचा होता. आघाडी कुणाचीच रहात नव्हती. मी नेहमीच स्वतःवर विश्‍वास ठेवून खेळते. ही लढतही तशीच खेळले. तिनेदेखील तसाच खेळ केला. ना मी कमी पडले ना ती भारी पडली. शेवटी कुणी तरी जिंकणार होते. काल ती जिंकली.