प्रो कबड्डीत तीन महिन्यांत १३८ सामने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई - देशातील सर्वांत मोठी लीग म्हणून प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रो कबड्डीचा पाचवा मोसम तब्बल तीन महिने रंगणार आहे. या काळात १३८ सामने होणार आहेत. प्रत्येक संघ किमान २२ साखळी सामने खेळणार आहे. चढाई-पकडींच्या या खेळात खेळाडूंची मात्र चांगलीच दमछाक होण्याची शक्‍यता आहे.

आठवड्यात केवळ एक दिवस विश्रांती, खेळाडूंची होणार दमछाक 
मुंबई - देशातील सर्वांत मोठी लीग म्हणून प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रो कबड्डीचा पाचवा मोसम तब्बल तीन महिने रंगणार आहे. या काळात १३८ सामने होणार आहेत. प्रत्येक संघ किमान २२ साखळी सामने खेळणार आहे. चढाई-पकडींच्या या खेळात खेळाडूंची मात्र चांगलीच दमछाक होण्याची शक्‍यता आहे.

आठ संघावरून १२ संघ अशी व्याप्ती वाढवणाऱ्या प्रो कबड्डीने आपला बहुचर्चित कार्यक्रम आज मुंबईत जाहीर केला. २८ जुलै ते २८ ऑक्‍टोबर असा तीन महिन्यांचा कार्यक्रम आहे. एरवी इतर स्पर्धांप्रमाणे कार्यक्रम न आखता वेगळा विचार या वेळी करण्यात आला आहे. त्यानुसार, साखळी सामन्यांनंतर आयपीएलप्रमाणे क्‍वॉलिफायर, एलिमिनेटर असे सामने होतील. त्यानंतर अंतिम संघ ठरतील.

दोन्ही गटांतील प्रत्येकी तीन संघ क्वॉलिफाईंगसाठी पात्र ठरतील. उपांत्य सामन्यांऐवजी क्वॉलिफाईंगचे तीन आणि एलिमिनेटरचा एक सामना होईल. आयपीएलमध्ये गटातील पहिल्या दोन संघात क्वॉलिफायरचा पहिला सामना होतो आणि त्यातील पराभूत संघाला अंतिम सामन्यासाठी एलिमिनेटरची आणखी एक संधी मिळते तशीच संधी प्रो मधील पहिल्या दोन संघांत होणाऱ्या क्वॉलिफायर-३ सामन्यांतून मिळणार आहे.   

क्वॉलिफायरचे दोन सामने मुंबईत २२ आणि २३ ऑक्‍टोबरला होणार आहे, तर एलिमिनेटर आणि अंतिम सामना चेन्नईला अनुक्रमे २६ आणि २८ ऑक्‍टोबरला होणार आहे. स्पर्धेची सुरवात हैदराबादला २८ जुलैपासून सुरू होईल. पूर्वीच्या चार मोसमांत प्रत्येक संघांच्या ठिकाणी चार दिवस सामने होत होते, आता प्रत्येक ठिकाणी एक दिवसाच्या विश्रांतीचा अपवाद वगळता सहा दिवस सामने होतील. प्रत्येक सोमवार हा विश्रांतीचा दिवस असेल.

प्रत्येक संघ खेळणार २२ सामने
बारा संघांची दोन गटांत विभागणी
प्रत्येक गटात संघ एकमेकांशी तीनवेळा खेळणार (सामने १५)
गटसाखळी झाल्यावर बारा संघ एकमेकांशी खेळणार (सामने ६)
त्यानंतर एक वाइल्ड कार्ड सामना (वाइल्ड कार्ड सामने ६ ते १२ ऑक्‍टोबरदरम्यान जयपूरला)

गटवारी
अ गट - यू मुम्बा, दिल्ली दबंग, जयपूर पिंक पॅंथर, पुणेरी पलटण, हरयाना स्टेलर्स, गुजरात फ्रंटजायंट्‌स.

ब गट - तेलगू टायटन्स, बंगळुरू बुल्स, पटणा पायरट्‌स, बंगाल वॉरियर्स, युपी योद्धा, तमीळ थलयवास्‌