प्रो-कबड्डी आजपासून

शैलेश नागवेकर
शुक्रवार, 28 जुलै 2017

हैदराबाद - सलग तीन महिने खेळण्याचे शिवधनुष्य पेलणे सोपे नसले, तरी त्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा विश्‍वास सर्व १२ कर्णधारांनी दिला. त्याच क्षणापासून प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमाचा दम घुमला. गतस्पर्धेचा समारोप झालेल्या हैदराबादमधूनच यंदाच्या नव्या मोसमाची सुरवात उद्यापासून होत आहे.

हैदराबादचे गच्चीबोवली स्टेडियम यंदाच्या प्रदीर्घ मोसमाच्या सलामीचे साक्षीदार होणार आहे. चार नवे संघ आणि पाच-सहा प्रमुख खेळाडू सोडले तर सर्वच खेळाडूंच्या झालेल्या लिलावामुळे सर्वच संघ नव्या भिडूंसह नवे राज्य मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तीन महिने, १३८ सामने, आठवड्याचे सहा दिवस रोज सामने, अशी सर्वसाधारण रचना असलेल्या या नव्या मोसमात काही नवे कर्णधारही दिसणार आहेत. 

सचिनचा सल्ला
यंदा नवा संघ असलेल्या तमीळ थलैवाचा कर्णधार अजय ठाकूर व त्याच्या खेळाडूंना दी ग्रेट सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शन लाभले आहे. सचिन या संघाचा सहमालक आहे. संघाच्या जर्सी अनावरणाच्या वेळी सचिन उपस्थित होता. त्याने आपली यशोगाथा आणि त्यासाठी कशी मेहनत घेतली हा अनुभव आम्हाला सांगितला. त्यामुळे आमच्या संघात चैतन्य संचारले आहे, असे अजय ठाकूरने सांगितले.