दिल्लीची जयपूरवर दबंगगिरी

शैलेश नागवेकर
रविवार, 30 जुलै 2017

हैदराबाद - विश्‍वकरंडक स्पर्धा गाजवणारे इराणचे मेराज शेख आणि अब्दोफझल यांच्या निर्णायक चढाया आणि त्यांना नीलेश शिंदे व बाजीराव होडगे यांनी दिलेली पकडींची भक्कम साथ, यामुळे दबंग दिल्लीने जयपूर पिंक पॅंथरचा मध्यंतराच्या सात गुणांच्या पिछाडीनंतर ३०-२६ असा पराभव केला आणि विजयी सलामी दिली.

हैदराबाद - विश्‍वकरंडक स्पर्धा गाजवणारे इराणचे मेराज शेख आणि अब्दोफझल यांच्या निर्णायक चढाया आणि त्यांना नीलेश शिंदे व बाजीराव होडगे यांनी दिलेली पकडींची भक्कम साथ, यामुळे दबंग दिल्लीने जयपूर पिंक पॅंथरचा मध्यंतराच्या सात गुणांच्या पिछाडीनंतर ३०-२६ असा पराभव केला आणि विजयी सलामी दिली.

आतापर्यंत दिल्लीचा संघ दुबळा समजला जात होता; पण महाराष्ट्रातील अनुभवी प्रशिक्षक रमेश भेंडगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने ताकद दाखवली. मध्यंतराला ९-१६ असे ते पिछाडीवर होते. माझ्याकडे यंदाच्या संघातील सर्वांत भक्कम बचाव आहे. ते काय करू शकतात हे तुम्हाला पुढील सामन्यांत दिसून येईल, असे भेंडगिरी यांनी सांगितले. 

तुडतुड्या जसवीर सिंगने एकाच चढाईत दोन गुण मिळवले आणि त्यानंतर लगेचच पुन्हा दोन गुणांची कमाई केली आणि दहाव्याच मिनिटाला जयपूरने लोण दिला. याचवेळी भेंडगिरी यांनी राखीव खेळाडू अब्दोफझलला मैदानात आणले आणि बघता बघता सामन्याचे चित्र बदलले. सुरुवातीला मेराजलाही जम बसला नव्हता; परंतु त्याने उत्तरार्धात आपली कमाल दाखवली. सहाव्याच मिनिटाला जयपूरवर लोण दिला आणि १८-१८ अशी बरोबरी साधली. दरम्यान, जसवीरला नीलेश आपल्या जाळ्यात पकडत होता; मात्र अधूनमधून तांत्रिक चुकांचे गुण त्यांना गमवावे लागले. काही मिनिटांनंतर दिल्लीने दुसरा लोण दिला आणि सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. गतमोसमापर्यंत कोलकताचे नेतृत्व करणारा नीलेश साळुंखे या मोसमात दिल्लीचा आघाडीचा बचावपटू आहे. त्याने हाय फाइव्ह अशी कामगिरी केली. मेराजने २० चढायांत सात गुण, तर अब्दोफलने चार गुणांची कमाई केली. 

पाटणाची विजयी सलामी
‘डुबकी किंग’ म्हणून लौकिक असणाऱ्या प्रदीप नरवालच्या १५ गुणांच्या जोरावर गतविजेत्या पाटणा पायरेटस्‌ने तेलगू टायटन्सचा ३५-२८ असा पराभव केला. प्रदीपला सूर सापडेपर्यंत त्याचा संघ १६-२० असा पिछाडीवर होता, पण एकाच चढाईत तीन आणि त्यानंतर दोन व लोण अशी कामगिरी करून त्याने संघाला विजयी केले. त्याच वेळी राहुल चौधरीच्या झालेल्या पकडी तेलगूच्या पराभवास कारणीभूत ठरल्या.

Web Title: sports news pro kabaddi